वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन लाखाचा ऐवज लंपास

शहरात घरफोडीचे सत्र कायम असून दोन नवीन घटनांमध्ये चोरटय़ांनी सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यातील एक घटना भरदिवसा घडली. या प्रकरणी आडगाव आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिली घटना बिडी कामगारनगर भागात घडली. याबाबत विशाल दाते यांनी तक्रार दिली आहे. दाते कुटुंबीय बाहेरगावी गेले असताना चोरटय़ांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेल्या ६० हजारच्या रोकडसह दागिने असा सुमारे ८५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी घटना काठे गल्लीत घडली. याबाबत सुमन गायकवाड यांनी तक्रार दिली. वनराज सोसायटीत गायकवाड यांचे घर आहे. हे कुटुंब सकाळी कामानिमित्त घराबाहेर गेले असता चोरटय़ांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून एक लाख २० हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, बंद घरे हेरून चोरटे घरफोडय़ा करीत असल्याचे दाखल होणाऱ्या गुन्ह्य़ांवरून लक्षात येते. प्रत्येक घरावर पोलीस यंत्रणा नजर ठेवू शकत नाही. सुरक्षारक्षक, शेजारी राहणारे कुटुंबीय यांनी सोसायटीत भ्रमंती करणाऱ्या संशयितांवर नजर ठेवणे गरजेचे आहे. याकरिता पूर्वी पोलिसांकडून ‘आपला शेजारी खरा पहारेकरी’ हा उपक्रम राबविला जात होता. नवनवीन उपक्रम राबविण्यात मग्न असलेल्या पोलिसांनी तो उपक्रम बाजूला ठेवला आहे. शेजारी राहणारे आवश्यक ती दक्षता घेत नाही आणि पोलीस जनजागृती करीत नसल्याने घरफोडीचे सत्र कायम राहिल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.