20 January 2019

News Flash

घरफोडीत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास

या प्रकरणी ओझर तसेच उपनगर पोलीस ठाण्यात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ओझर, नाशिक रोड येथील घटना

जिल्ह्य़ात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या दोन घटनांमध्ये चोरटय़ांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी ओझर तसेच उपनगर पोलीस ठाण्यात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओझर येथील नितीन शिंदे हे कुटुंबासमवेत शिंदे गल्लीत राहतात. काही कामानिमित्त ते कुटुंबासोबत बाहेरगावी गेले असता चोरटय़ांनी त्यांचे बंद दार हेरत हातसफाई केली. चोरटय़ांनी घराच्या पाठीमागील दरवाज्याची कडी तोडत कपाटातील एकूण एक लाख ३१ हजार ८०० रुपयांचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना नाशिकरोड परिसरात घडली.  बिटको येथील एका मंदिराजवळील समृद्धी अपार्टमेंटमध्ये देवी नाऊमल पारप्यानी (७४) हे राहतात.

रविवारी सकाळी पारप्यानी या घराचा दरवाजा बंद करून बाहेर गेल्या असता चोरटय़ांनी घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातून एकूण दोन लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात येताच पारप्यानी यांना मानसिक धक्का बसला. प्रकृती बरी झाल्यानंतर त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

First Published on January 12, 2018 1:53 am

Web Title: house robbery in nashik