नाशिक : शहर परिसरातील सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस आयुक्तांनी आढावा बैठकीत सूचना केल्यानंतर दोन सोनसाखळी चोरांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २३३ ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे किंमत आठ लाख ६६ हजार ७०० रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. रविवारी शहरात  घरफोडी करणाऱ्यालाही पकडण्यात आले.

भाजप कार्यालयाशेजारील चंदन बंगला परिसरात रविवारी चोरटय़ाने घरफोडी करून १७ लाख ८४ हजार ६२५ सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तीन संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.

तपासासाठी वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली होती. संशयित दीपाली साठे हिच्याकडे विचारपूस केली असता कडी-कोयंडा तोडलेला असल्याचे सांगितले. परंतु दरवाजाचे कुलूप सहज चावी लावून उघडले असल्याचे लक्षात आले. बंगल्याचे मालक बाहेर असताना ते कुठे आहेत, काय करत आहेत, याची माहिती दीपाली सातत्याने घेत असल्याचे तपासात उघड झाले. हाच धागा पकडून पोलिसांनी दीपाली हिस ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता तिने जुनेद ऊर्फ राजू चांद शेख (३८, रा. पंचशील नगर), सराईत गुन्हेगार सोहेल ऊर्फ बाबू पप्पू अन्सारी (२५, रा. भारतनगर) यांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत त्यांना न्यायालयात हजर केले. त्यांना २८ नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत दीपालीकडील सहा लाख, दोन हजार १२५ रुपयांचे दागिने, घडय़ाळे आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. तसेच जुनेदकडून तीन लाख ७३ हजार,९५० रुपयांचे सोन्याचे दागिने, घडय़ाळ आणि रोख रक्कम, तर सोहेलकडून चार लाख, ७५ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तिघांकडून १४ लाख ५१ हजार १२५ रुपयांचे दागिने, घडय़ाळे आणि रोख रक्कम असा माल हस्तगत करण्यात आला आहे.

दरम्यान, पंचवटी येथे राहणाऱ्या अक्षय दोंदे (२१), भूषण जाधव (२२) या सोनसाखळी चोरटय़ांना अटक करण्यात आली. त्यांनी पंचवटी, म्हसरूळ, गंगापूर रोड, इंदिरा नगर, भद्रकाली परिसरात सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून १० गुन्हे उघडकीस आले आहेत.