25 September 2020

News Flash

कौटुंबिक अत्याचाराच्या वाढत्या घटना कुटुंब व्यवस्थेसाठी चिंताजनक

मानवी तस्करी अर्थात देहविक्री व्यवसायातील अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रयत्न होत आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

महिलांवरील अत्याचाराचा आलेख सातत्याने उंचावत असून शहरातील विविध पोलीस ठाण्यांत अवघ्या चार महिन्यांत अपहरण, विनयभंग वा छेडछाड, खून आदी प्रकारचे १६० हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात सर्वाधिक नोंदी कौटुंबिक अत्याचाराच्या असल्या तरी त्याचा बारकाईने विचार केल्यास प्रत्यक्षात अत्याचाराच्या घटना तुरळक असून त्यांना कायद्याविषयी असणारे ज्ञान या आकडेवारीत भर घालताना दिसते. काही अपवाद वगळता कोणाला तरी धडा शिकवायचा किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून महिला पोलीस ठाण्याची पायरी चढत आहे. हे वातावरण कुटुंब व्यवस्थेसाठी चिंताजनक आहे.
पोलीस विभागाच्या महिला विशेष सुरक्षा शाखेकडे महिलांशी संबंधित शारीरिक, मानसिक, आर्थिक तसेच महिला मानवी तस्करी (पीटा), अपहरण अशा विविध तक्रारींचा निपटारा केला जातो. तत्पूर्वी, या तक्रारी विविध पोलीस ठाण्यात नोंदविल्या जातात. या वर्षांचा विचार केल्यास शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १६२ महिलांविषयक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात शाब्दीक वा शारीरिक छळवणूक, मानसिक व शारीरिक अत्याचार, आर्थिक कारणास्तव मानसिक वा शारीरिक शोषण, मारहाण, जिवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग आणि बलात्कार या सर्वाचा विचार केला गेला आहे. तसेच मानवी तस्करी अर्थात देहविक्री व्यवसायातील अपप्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रयत्न होत आहे.
आकडेवारीच्या भाषेत सांगायचे तर छळवणूक आणि खूनाचा प्रयत्न अंतर्गत २, शारीरिक व मानसिक अत्याचार प्रकरणी २, कौटुंबिक अत्याचार ६३, विनयभंग २७, वासुगिरी २, बलात्कार १०, आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच, या काळात १४ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले. विविध पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यांची ही आकडेवारी महिलांवरील अत्याचाराचे वास्तव अधोरेखीत करते. यामध्ये महिलांबाबत घरगुती वाद विवाद, मानपान, आर्थिक देवाणघेवाण यासह अन्य काही कारणास्तव मारझोड, घरातून हाकलून देणे असे प्रकार वाढले आहेत. तसेच महिलांच्या शारीरिक शोषणातही वाढ होत असल्याचे दिसून येते.
महिलांवरील अत्याचाराच्या घटना आणि वास्तव यात फरक आहे. कौटुंबिक वाद विवादांमध्ये अपवाद वगळता अनेकदा सासरच्या मंडळींना धडा शिकवायचा, विभक्त होण्याचा पर्याय म्हणून, नात्यातील कोणी तरी सांगितले म्हणून महिलांकडून तक्रार देण्याचे पाऊल उचलले जाते. महिलांना आपल्या हक्कांचे भान व कायद्याची समज आल्यामुळे आपल्याला होणारा त्रास कसा कमी होऊ शकेल यासाठी त्या सजग झाल्या असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र बदलती परिस्थिती कौटुंबिक व्यवस्थेला मारक ठरणारी असल्याचे चित्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2016 3:21 am

Web Title: huge increase in domestic violence cases in nashik
Next Stories
1 शिवसेना खासदार आणि भाजप आमदारात श्रेयाची लढाई
2 मरकडेय गडावरील स्वच्छता मोहिमेत अर्धा टन कचरा संकलित
3 तपशील चोरूनच एटीएममधून खातेदारांची रोकड गायब
Just Now!
X