27 September 2020

News Flash

आदर्श गाव योजनेसाठी ‘नातीगोती’

२०१९ पर्यंत टप्प्याटप्प्याने तीन गावांचा विकास करण्याचे उद्दिष्ट

आ. प्रा. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. बाळासाहेब सानप.

निकषांचा अडथळा दूर करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना; २०१९ पर्यंत टप्प्याटप्प्याने तीन गावांचा विकास करण्याचे उद्दिष्ट
राज्यात राबविल्या जाणाऱ्या आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत शहरातील भाजपच्या तिन्ही आमदारांना नात्यागोत्यांशी संबंधित गावांचा विकास करण्यातच अधिक रस असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात निकषांचा अडथळा येत असल्याने वेगवेगळ्या क्लृप्त्याही लढविल्या जात आहेत. नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी चांदवड मतदारसंघातील भाजप आमदाराची सासुरवाडी म्हणजे ‘ननावे’ गावाची केलेली निवड, हे त्याचे उदाहरण. नाशिक पूर्वचे आ. बाळासाहेब सानप यांनादेखील मूळ गाव आणि मोठा गोतावळा असणाऱ्या दिंडोरीतील ढकांबेचा विसर पडलेला नाही. या गावाला आदर्श बनविण्याच्या संकल्पात निकष आडवा येणार नसल्याचा त्यांचा होरा आहे. नाशिक पश्चिमच्या आमदार आ. सीमा हिरे यांनी प्रारंभी आदर्श ग्राम योजनेसाठी सासुरवाडीला प्राधान्य दिले होते. मालेगाव तालुक्यातील निमगावचा त्यांना कायापालट करायचा होता. परंतु, सासुरवाडी असलेले गाव घेता येणार नसल्यामुळे आता याच तालुक्यातील अन्य गावाच्या पर्यायावर त्या विचार करत आहेत.
केंद्राच्या धर्तीवर राज्य शासनाने विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्यांनी सुचविलेल्या गावामध्ये आमदार आदर्श गाव योजना राबविण्याचे आधीच जाहीर केले आहे. या माध्यमातून संबंधित गावांचा सर्वागीण विकास साधण्यात येणार असून प्रत्येक आमदाराला २०१९ पर्यंत टप्प्याटप्प्याने तीन गावांचा विकास करावयाचा आहे. या गावातील विकास व सुधारणांमुळे परिसरातील ग्रामपंचायतींनाही प्रेरणा मिळेल असा त्यामागील उद्देश. या योजनेंतर्गत आमदारांना आपल्या मतदारसंघातील गावाची निवड करता येते. जिल्ह्यातील १५ पैकी १२ विधानसभा मतदारसंघ ग्रामीण व निमशहरी गटात येतात. उपरोक्त क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील प्रत्येकी एका गावाची निवड केली. तथापि, ज्या आमदारांचा शहरी विधानसभा मतदारसंघ आहे, त्यांना शासनाने त्यांच्या सोयीच्या दृष्टीने जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीची निवड करण्यास मुभा दिली आहे. या योजनेंतर्गत निवडलेल्या गावातील गरजा लक्षात घेऊन ग्रामविकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. माध्यान्ह भोजन योजना, कुपोषण कमी करणे, निर्मलग्राम, जलयुक्त शिवार, युवकांसाठी कौशल्यविकास कार्यक्रम, आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी उपजिविकेसाठी शाश्वत उपाय, सेंद्रिय शेतीचा प्रसार यासह शुद्ध पाणीपुरवठा, रस्ते व इतर बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या माध्यमातून संबंधित गावांच्या विकासासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमासह शासनाकडून भरीव निधी उपलब्ध केला जाणार आहे. ही संधी लक्षात घेऊन शहरातील तिन्ही आमदारांनी आपल्या अथवा सहकाऱ्यांच्या नात्या-गोत्यातील गावांचे ‘चांगभले’ करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे लक्षात येते. योजनेंतर्गत आमदाराला आपले मूळ गाव अथवा सासुरवाडीची निवड करता येणार नसल्याचा निकष असूनही काही पळवाटा शोधल्या जात आहेत.
प्रा. देवयानी फरांदे यांनी योजनेच्या पहिल्या टप्प्यात गावाची निवड करताना ते आपल्याच पक्षीय आमदाराच्या मतदारसंघातील असेल याची दक्षता घेतली. चांदवड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे डॉ. राहुल आहेर करतात. या योजनेंतर्गत प्रारंभी आहेर यांचा प्रयत्न आपल्या सासुरवाडीचा म्हणजेच ननावे या गावच्या विकासाचा होता. परंतु निकष आडवा आल्यामुळे त्यांनी या गावच्या विकासाची जबाबदारी प्रा. फरांदे यांच्यावर सोपवत सासुरवाडीची चांगलीच काळची घेतल्याचे लक्षात येते. आमदार बाळासाहेब सानप यांची गोष्टच न्यारी. दिंडोरी तालुक्यातील ढकांबे हे सानप यांचे मूळ गाव. या गावात त्यांचा बराच गोतावळा आहे. जेव्हा आदर्श गाव योजनेसाठी नांव सुचविण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता या गावाचे भले करण्याचा निर्णय घेतला. आपला जन्म नाशिकचा, शिक्षण नाशिकमध्ये झालेले असून त्या गावात आपले काही नसल्यामुळे ढकांबेचे नाव कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यात काही अवरोध आल्यास नाशिक तालुक्यातील लाखलगावचा पर्याय त्यांनी समोर ठेवला आहे.आ. सीमा हिरे यांची सासुरवाडी मालेगाव तालुक्यातील निमगावची. शासनाने ही योजना सादर केल्यानंतर त्यांना देखील दुष्काळी भागातील सासुरवाडीचा विकास करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी या योजनेसाठी निमगावचे नाव सुचविले. परंतु ते गाव निकषात बसणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सूचित केल्यावर त्यांनी मालेगाव तालुक्यातील अन्य गावांवार विचार करणे सुरू केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2016 2:21 am

Web Title: ideal village project start at nashik
Next Stories
1 आगीतून कुटुंबीयांना वाचविण्यात यश
2 मातंग संघाच्या मोर्चामुळे वाहतूक ठप्प
3 ‘मीडियावर बोलू काही’द्वारे माध्यमजागृतीची प्रचिती
Just Now!
X