नाशिक : आदिवासी दुर्गम असलेल्या इगतपुरी तालुक्यात लसीकरणाबाबत उत्सुकता वाढत असतांना पुरेशा मात्रा उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. लोकसंख्येच्या मानाने पुरेशा मात्रा उपलब्ध करुन द्याव्यात आणि लसीकरण वाढवावे, अशी मागणी घोटीचे उपसरपंच रामदास भोर यांनी के ली आहे.

इगतपुरी तालुक्यात प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रास फक्त सोमवारी आणि गुरुवारी ५० मात्रा उपलब्ध होत आहेत. त्यामुळे तालुक्यातील बरेच नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. विशेषत: घोटी शहराची लोकसंख्या सुमारे २५ हजार असताना घोटी ग्रामीण रुग्णालयास देखील ५०  मात्रा देण्यात येत आहेत. त्यामुळे तालुक्यासह घोटी शहरासाठी मोठय़ा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्याची मागणी उपसरपंच भोर यांनी केली आहे.

शासनाने एक मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. परंतु, त्यासंदर्भातील अ‍ॅपवर नोंदणी देखील होत नव्हती. आता तर संबंधित वयोगटाचे लसीकरणच थांबविले आहे. दोन ते तीन महिन्यापूर्वी ज्या नागरिकांनी लस घेतली त्यांना दुसरी मात्रादेखील मिळत नसल्याचे चित्र आहे. दुसऱ्या मात्रेसाठी नागरिक सहा ते सात तास बसून राहतात. घोटीसारख्या शहरात लस मिळावी यासाठी लोक पहाटेपासूनच रांगेत उभे असतात. त्यामुळे शासनाने इगतपुरी तालुक्यासह घोटी शहरात लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भोर यांनी केली आहे.