प्रल्हाद बोरसे, लोकसत्ता

मालेगाव : उत्तर महाराष्ट्रातील करोनाचे केंद्र बनलेल्या मालेगावात संसर्ग नियंत्रणात आणण्यात यश आल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले होते. मात्र गेल्या दहा दिवसांत रुग्णसंख्या पुन्हा अचानक वाढल्याने मालेगावकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अंत्यविधी तसेच थांबलेले विवाह समारंभ उरकताना ग्रामीण भागात शारीरिक अंतर पाळण्यासारख्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर ग्रामीण भागात अचानक वाढणाऱ्या करोना रुग्णांची संख्या धोकादायक वळण घेऊ लागली आहे.

तीन महिन्यांत शहरात एकूण १०५० जणांना करोनाची बाधा झाली असून ७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच तालुक्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत ९५ जण करोनाबाधित आढळून आले. तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. उपचारानंतर बाधितांपैकी बहुसंख्य रुग्ण करोनामुक्त झाले असून सद्य:स्थितीत शहरातील १३५ आणि ग्रामीण भागातील ४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

८ एप्रिल रोजी शहरात प्रथम पाच रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर ‘वाढता वाढता वाढे’ याप्रमाणे महिनाभरात ही संख्या तब्बल ४०० वर पोहोचली होती. त्यानंतरच्या पंधरवडय़ात त्यात आणखी ३०० रुग्णांची भर पडली. त्यामुळे मालेगावकडे सर्वाच्या नजरा खिळल्या होत्या. यादरम्यान करण्यात आलेल्या प्रशासकीय उपाययोजना तसेच जनजागृतीमुळे शहरातील करोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले. पहिल्या दीड महिन्यांत ७०० पर्यंत रुग्णसंख्या गेलेल्या मालेगावात नंतरच्या महिनाभरात केवळ २०० च्या आसपास नवीन रुग्णांची भर पडली. अशा रीतीने रुग्णांचा घटता आलेख आणि एकूणच संसर्ग नियंत्रणात आणण्यात मिळालेल्या यशामुळे राज्यभर ‘मालेगाव प्रारूप’चा बोलबाला सुरू झाला; परंतु हे सुख फार काळ टिकू शकेल की नाही, असे वातावरण सध्या निर्माण झाले आहे.

काही दिवसांत शहरातील रुग्णसंख्येने अचानक उसळी घेतल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. घसरता आलेख असलेल्या मालेगावात उलट स्थिती निर्माण होऊन पंधरा दिवसांत जवळपास १५० नव्या रुग्णांची भर पडली आहे. शारीरिक अंतर पाळण्यासारख्या नियमांकडे टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर हळूहळू दुर्लक्ष होऊ  लागल्याचा हा परिपाक असल्याचे जाणकारांचे मत आहे.

शहरात निराशाजनक परिस्थिती असताना ग्रामीण भागात त्यापेक्षाही अधिक चिंताजनक स्थिती आहे. टाळेबंदीमुळे अनेकांवर ठरलेले विवाह लांबणीवर टाकावे लागण्याची नामुष्की आली होती. आता टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर काहीशा साध्या पद्धतीने आणि घाईघाईत लग्नाचा धडाका लावताना विशेषत: ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शारीरिक अंतर पाळण्याचे भान राखले जात नाही. अंत्यविधीसारख्या ठिकाणीही लोकांची गर्दी उसळत असल्याने दिसते. मुखपट्टी बांधण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू असल्याने बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना शहरात धाव घ्यावी लागत आहे. या सर्वाचा परिणाम रुग्णवाढीत झाला आहे.

तालुक्यातील माळमाथ्यावरील जळकू येथे एकाच कुटुंबातील सात जणांसह एकूण नऊ  जणांना करोनाचा संसर्ग झाला. एका वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी ही सर्व मंडळी एकत्र जमा झाल्याचे सांगितले जाते. अजंग येथेही एकाच कुटुंबातील चार जणांना संसर्ग झाला. या कुटुंबातील एका वृद्धाचे अलीकडेच निधन झाले. या अंत्यविधीस उपस्थित राहिलेल्यांपैकी एखाद्याकडून इतरांना संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी दाभाडी येथे एकाच कुटुंबातील पाच जणांना करोनाची लागण झाली होती. पाचपैकी एक वृद्धा त्याआधी एका अंत्यविधीस उपस्थित राहिली होती. शहरालगत असलेल्या वडगाव येथे सहा जणांना बाधा झाली होती. त्यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मृत्यू झालेल्या एका ४५ वर्षांच्या व्यक्तीच्या आईचे त्याआधी वृद्धापकाळाने निधन झाले होते. या अंत्यविधीसाठी बाहेरगावहून नातेवाईक आल्याचे सांगितले जाते.