भद्रकाली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुरू असलेल्या अवैध धंद्यांची यादी सादर करतानाच शहरात सुरू असलेले अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी बुधवारी नाशिक शहर विकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. आर्थिक लाभातून अवैध धंदेचालकांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

आघाडीचे सैय्यद मुशीर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनास सादर केले. त्यात नवापुरा, फुले मार्केट, दूध बाजार, चौक मंडई, बागवानपुरा, कथडा, वडाळा नाका, मध्यवर्ती बसस्थानक या परिसरात चाललेल्या मटका, पत्ते, रोलेट जुगार, चरस-गांजा, कॉईन गेम, व्हिडीओ पार्लर या व्यवसायांची यादी सादर करत आंदोलकांनी खळबळ उडवून दिली. हे व्यवसाय कोण चालवते, त्यांच्याकडून पोलिसांना किती हप्ता दिला जातो याचाही उल्लेख निवेदनात केला गेला आहे. गेल्या काही महिन्यात शहरातील गुन्हेगारीचा आलेख उंचावत आहे. अवैध व्यवसाय वाढल्याने शहरात कायदा व सुव्यवस्थेला राखण्यात पोलिसांना अपयश आले आहे. शहरात सर्वाधिक प्रमाणात अवैध व्यवसाय भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असून हप्तेखोरीमुळे पोलीस जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही मुशीर यांनी केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अचानक टाकलेल्या छाप्यात या ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या व्यावसायिकांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांची चौकशी करावी, त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी आणि अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावेत, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.