जमीनदोस्त केलेले साहित्य पडून; महात्मा गांधी रस्त्यावरील वाहनचालक त्रस्त

महात्मा गांधी रस्त्यावरील राजेंद्र पारख इलेक्ट्रॉनिक्स या भल्यामोठय़ा दालनाचे अतिक्रमण जिल्हा परिषदेने गुरुवारी हटविले, तथापि जमीनदोस्त केलेले पत्रे व तत्सम साहित्य उचलण्याचे टाळल्याने त्रास मात्र कायम राहिला आहे.  रस्त्यालगत अस्ताव्यस्त पडलेले हे साहित्य अपघाताचे कारण ठरू शकते. याची कोणतेही गांभीर्य न ठेवता कारवाईनंतर जिल्हा परिषद यंत्रणा अंतर्धान पावल्याचे सांगितले जात आहे. ही बाब वाहनधारकांसह स्थानिक व्यापाऱ्यांसाठी आता त्रासदायक ठरली आहे.

महात्मा गांधी रस्त्यावरील स्टेडिअम कॉम्प्लेक्सला लागून जिल्हा परिषदेचा मोठा भूखंड आहे. २०१० मध्ये ही जागा राजेंद्र पारख इलेक्ट्रॉनिक्सला ११ महिन्यांच्या भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. हा करार संपुष्टात आल्यानंतर जागा खाली करण्याबाबत नोटीस पाठवण्यात आली. परंतु, व्यावसायिकाने न्यायालयात दावा दाखल करत मुदत वाढवून देण्याची मागणी केली. जवळपास पाच ते सहा वर्षांपासून हा विषय न्यायप्रविष्ट होता. जिल्हा परिषदेने महापालिकेच्या मदतीने हे बहुचर्चित अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला. सकाळी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, महापालिकेचे पथक आणि पोलीस फौजफाटा महात्मा गांधी रस्त्यावर दाखल झाला. जवळपास तीन तास अतिक्रमणधारकाला दालनातील सर्व साहित्य नेण्यास वेळ देण्यात आला. या काळात अतिक्रमणधारकाच्या नातेवाईकांनी वारंवार मोहिमेत अडथळे आणले. बऱ्याच कालापव्ययानंतर ही कारवाई सुरू झाली. दोन ते अडीच तासात दालन जमीनदोस्त झाले. त्याचे अस्ताव्यस्त पडलेले साहित्य पुढील काळात जमा केले जाणार असताना अतिक्रमणधारकाने न्यायालयीन आदेशाची प्रत संबंधित यंत्रणेला सादर केली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने जागेवर आपला फलक उभारत अस्ताव्यस्त पडलेले साहित्य उचलण्याचे काम थांबविले.

त्यावेळी जमीनदोस्त झालेले काही साहित्य महात्मा गांधी रस्त्यालगत तर काही स्टेडिअम कॉम्प्लेक्सच्या दुकानांजवळ पडलेले आहे. त्यामध्ये लोखंडी पाईप, कापलेले पत्रे, प्लायवूड आदींचा अंतर्भाव असल्याने अपघातही घडण्याचा धोका संभवतो. रस्त्यावर आलेली ही सामग्री जिल्हा परिषदेला मोकळ्या केलेल्या भूखंडात ठेवता आली असती. परंतु, त्यांनी त्याचा वाहनधारक व पादचाऱ्यांना काही त्रास होईल याचा विचार केला नसल्याची सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यवाहीने भूखंड मोकळा झाला, पण व्यापाऱ्यांसाठी अस्ताव्यस्त पडलेले साहित्य डोकेदुखी ठरले आहे. रस्त्यावर आलेल्या साहित्यामुळे त्या पट्टय़ात वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नाही. यामुळे वाहनधारक मागे-पुढे वाहने उभी करतात, अशी व्यापाऱ्यांची तक्रार आहे. रस्त्यावर आलेला हा पसारा किमान मोकळ्या जागेत नेण्याची मागणी केली जात आहे.