तपासणीसाठी पुढे जिल्हा, मनपा प्रशासनाचा पुढाकार

नाशिक : करोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी आरोग्य, जिल्हा, महापालिका प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. सर्दी, खोकला सारखी लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या तपासणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिक शाखेने ६२ दवाखाने (क्लिनिक) सुरू करण्याचे ठरविले आहे. या व्यवस्थेमुळे करोनाला प्रतिबंध करण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी म्हटले आहे.

राज्यासह देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद केल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. दवाखाने बंद असल्याने इतर आजारांबाबत उपचारासाठी नागरिकांना डॉक्टर मिळत नाही. खासगी दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. करोना संशयित लवकर ओळखता यावेत म्हणून आयएमएने सहकार्याची भूमिका घेतली आहे. करोनासदृश्य आजारांच्या तपासणीसाठी आयएमए ६२ क्लिनिक अर्थात दवाखाने सुरू करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयएमएचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे आणि त्यांचे सहकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

यावेळी खासगी डॉक्टरांच्या सहकार्याने ६२ दवाखाने सुरु करावेत आणि तिथे त्याच भागातील डॉक्टरांची प्रत्येकी एक दिवस या आवर्तन पध्दतीने एकाच डॉक्टराची नेमणूक करावी. या डॉक्टरांनी केवळ सर्दी, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या करोना संशयित रुग्णांची तपासणी करावी. या प्रकारे यंत्रणा राबविली तर खासगी डॉक्टरांची शासनाला मदत होईल. करोनाला प्रतिबंध करण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले. त्यास आयएमएने तत्काळ सहमती दर्शविली. संघटनेचे अध्यक्ष डॉम् चंद्रात्रे यांनी संघटनेच्यावतीने सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. यावेळी असोसिएशनचे डॉ. प्रशांत देवरे, डॉ. प्रशांत सोनवणे, डॉ. प्राजक्ता लेले. डॉ. सुदर्शन अहिरे उपस्थित होते.