नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर महापौरांचे आदेश

नाशिक : भारतीय लष्कराच्या शौर्याचे प्रतीक असलेला रणगाडा लेखानगर येथील मोकळ्या जागेत ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन १४ महिन्यांपासून टाळाटाळ करीत असल्याचा आरोप नगरसेवक प्रवीण तिदमे यांनी केला. सर्वसाधारण सभेत निषेधाचा फलक परिधान करत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. रणगाडय़ाची प्रतिकृती प्रशासनास भेट दिली. त्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी हे काम तातडीने करण्याचे आदेश दिले.

लेखानगर येथे रणगाडा ठेवण्याचा विषय अनेक महिन्यांपासून रखडलेला आहे. मनपाची ही जागा आहे. चौकालगतच्या परमिट रूम आणि बिअर बार असलेल्या हॉटेलला स्वत:चे वाहनतळ नाही. संबंधितांकडून रणगाडा बसविण्यात येणारी मनपाची जागा वाहनतळासाठी वापरली जाते. मोफत वाहनतळाची व्यवस्था बंद होऊ  नये म्हणून रणगाडय़ाला विरोध केला जात आहे. या मोकळ्या जागेवर काम न करण्याबाबत न्यायालयाने मनाई हुकूम दिलेला नाही. सिडको, मनपा आणि संरक्षण विभागाने या जागेबाबत मान्यता दिली आहे. वाहतूक पोलीस शाखेने ना हरकत दाखला दिला आहे. रणगाडा ठेवण्याचे काम करण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यास तयार आहे. असे असताना मनपा प्रशासन रणगाडा ठेवण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप तिदमे यांनी केला.

भारतीय लष्कराचा रणगाडा बसविण्यास विरोध का केला जात आहे, धनशक्तीपुढे देशभक्ती झुकली का, आदी प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी प्रशासनाने भूमिका मांडण्याची मागणी केली. पालिका प्रशासन रणगाडय़ाचा अवमान करत आहे. लेखानगर येथे बसविला जाणारा रणगाडा पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात सहभागी झाला होता. शौर्याचे प्रतीक असणारा रणगाडा ठेवण्यास पालिका आयुक्तांनी आदेश देऊनही काम होत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.