ढोल-ताशांचा गजर आणि डिजेच्या दणदणाटात गुलालाची उधळण करत नाशिक शहरासह ग्रामीण भागात आपल्या लाडक्या गणरायाला पुढील वर्षी लवकर.. अशी साद घालत निरोप देण्यात आला. जवळपास बारा तास चाललेल्या नाशिकच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीत गुलालवाडी मित्र मंडळाचे बाल-गोपाळांचे लेझिम पथक आणि इतर मंडळांतील युवक- युवतींचा सहभाग असणारी बँड पथके हे जसे खास आकर्षण ठरले, तसेच नेत्रदीपक रोषणाईने सजविलेल्या भव्य गणेशमूर्ती, पर्यावरणपूरक तसेच सिंहस्थाची मोहोर उमटविणारे देखावे ही देखील वैशिष्ठय़े राहिली. मेनरोडवर स्थानिकांनी पुष्पवृष्टी केली. पाऊस नसल्याने मिरवणूक बघण्यासाठी आबालवृध्दांसह बच्चे कंपनीने मोठी गर्दी केली. नियोजित वेळेत सुरू झालेली मिरवणूक ठिकठिकाणी राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांकडून होणाऱ्या स्वागतामुळे कमालीची रेंगाळल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, रानवड येथे मयूर संपत वाघ (१६) याचा गणेश विसर्जन करताना तलावात बुडून मृत्यू झाला.
वाकडी बारव येथे दुपारी अडीचच्या सुमारास महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते महापालिकेच्या गणपतीची आरती झाल्यानंतर मिरवणुकीला दिमाखात सुरूवात झाली. पालकमंत्री गिरीश महाजन, उपमहापौर गुरुमित बग्गा यांच्यासह नगरसेवक व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. महापालिकेने यंदा खास ढोल-पथक मागविले होते. ढोलच्या तालावर सर्वानी ठेका धरला. त्यानंतर मान होता तो, रविवार कारंजा मित्र मंडळाचा. या मंडळाने पर्यावरणपूरक देखावा सादर केला. आकर्षक विद्युत रोषणाईमुळे चांदीची गणेशमूर्ती सर्वाचे लक्ष वेधून घेत होती. गुलालवाडी मित्र मंडळाच्या ढोल पथकांत युवती व महिलांचा लक्षणिय सहभाग होता. जमिनीवर ढोल रचून त्यावर उभे राहत युवती वादकांनी आपली कला सादर केली. शिवाय, बालगोपाळांचे लेझिम पथक नेहमीचे आकर्षण ठरले. या मंडळाची मिरवणूक बघण्यासाठी भाविकांची धडपड सुरू होती.
यंदा मिरवणुकीत सूर्यप्रकाश नवप्रकाश, साक्षी गणेश आदी मित्र मंडळांतर्फे प्रकाशझोत सोडल्यामुळे अंधारात त्या गणेश मूर्ती डोळ्यांचे पारणे फेडत होत्या. या आकर्षक गणरायांना भ्रमणध्वनीतील कॅमेऱ्यात टिपण्यासाठी भाविकांची चढाओढ सुरू होती. नाशिकचा राजा म्हणून ओळखल्या जाणारा गणराया युवक-युवतींच्या ढोल पथकाच्या तालावर मार्गक्रमण करत होता.
पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या युवतींतर्फे साहसी खेळ सादर करण्यात आले. युवा-युवतींचा सहभाग असणारी ढोलपथके मिरवणुकीची वैशिष्ठय़े ठरली. पांढऱ्या पेहेरावात भगवा फेटा व शेला घेऊन सहभागी झालेल्यांनी भगव्या झेंडय़ांद्वारे नृत्य सादर केले. काही मंडळांच्या मिरवणुकीत चित्तथरारक मर्दानी खेळांचे सादरीकरण झाले. मिरवणूक रेंगाळू नये म्हणून पोलिसांनी दक्षता घेतली असली तरी ठिकठिकाणी मंडळांचे राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांमार्फत होणाऱ्या स्वागताने त्यास अपेक्षित यश मिळाले नाही. स्वागत कमानीसमोर मंडळांतर्फे नाचण्यात बराच वेळ घालविला जात असल्याने काही ठिकाणी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
मिरवणुकीत एकूण २२ मंडळे सहभागी झाली. परंतु, त्यांचे क्रमांक काहिसे मागे-पुढे झाले. राजकीय दबाव टाकून काहींनी पुढील क्रमांक हिसकावल्याने मध्येच शेवटच्या काही क्रमांकांच्या मंडळांचा शिरकाव झाल्याचे पहावयास मिळाले. न्यायालयाच्या निर्देशानुसार रात्री बारा वाजता वाद्ये वाजविण्यास पोलिसांनी प्रतिबंध झाल्यावर मिरवणुकीचा वेग वाढला. किरकोळ अपवाद वगळता मिरवणूक शांततेत पार पडली. वाद्ये बंद झाल्यामुळे गणेश मंडळांनी शक्य तितक्या लवकर विसर्जन करण्यास प्राधान्य दिले. रात्री दोन वाजता अखेरच्या मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रायफलधारी जवान ठिकठिकाणी नजर ठेऊन होते. दरम्यान, शहरातील नाशिकरोड, पंचवटी, गंगापूर रोड, सातपूर, अंबड इतर भागातही वाजतगाजत व विधीवत पूजन करून गणेश विसर्जन करण्यात आले. ग्रामीण भागातही असाच उत्साह दिसून आला. ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. मनमाड शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री निलमणीची खास पुणेरी थाटात संस्कृती व परंपरेचे जतन करत निघालेली पालखी, सर्वात जुन्या आझाद गणेश मंडळासह युवक क्रांती गणेश मंडळ व अनेक मंडळांच्या झांज पथकासह निघालेल्या मिरवणुका वैशिष्ठय़ ठरले. दरम्यान, रानवड येथे गणेश विसर्जन करताना भवानी देवीच्या मंदिरालगत्या तलावात बुडून मयूर संपत वाघ (१६) याचा मृत्यू झाला. काकासाहेब नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात तो दहावीत शिक्षण घेत होता.
पोलिसांना धक्काबुक्की
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्ताचे काम करणाऱ्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना एका टोळक्याने धक्काबुक्की करत जिवे मारण्याची धमकी देण्याची घटना संसरी येथे घडली. संसरी गाव येथे मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. पी. पाटील, उपनिरीक्षक पी. डी. माळी व कर्मचारी तैनात होते. रात्री एकच्या सुमारास युवराज राजाभाऊ गोडसे, बापू कडोळ व अन्य आठ ते दहा संशयितांनी पोलिसांनी नाहक हुज्जत घातली. संशयितांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.