नाशिक : राज्यातील जनता पुरात वाहून जात असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेतून निवडणुकीचा प्रचार करतात. त्यामुळे पुरात अडकलेली जनता महत्त्वाची की निवडणुकीचा प्रचार, असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेप्रसंगी कळवण येथे नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी भाजप- सेनेवर टीकास्त्र सोडले. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते. डॉ. कोल्हे यांनीही सेना-भाजपवर टीकास्त्र सोडले. सत्ताधाऱ्यांनी  विकासकामे केली असतील तर त्यांना वेगळा जनादेश का मागावा लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढण्यापेक्षा श्वेतपत्रिका काढून राज्यात किती उद्योग आले, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटला का, हे जाहीर करावे, असा टोला कोल्हे यांनी लगावला.

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा तूर्तास स्थगित

मुंबई : राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा गुरुवारपासून तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसची ६ ऑगस्टला शिवस्वराज्य यात्रा सुरू करण्यात आली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्य़ाला पुराने वेढले आहे. या पूरग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुढे सरसावली आहे.