17 November 2019

News Flash

नव्या वाणामुळे द्राक्ष उत्पादकांचा नफा वाढणार

विदेशात मागणी असणारे ‘आरा’ देशात प्रथमच उपलब्ध

विदेशात मागणी असणारे ‘आरा’ देशात प्रथमच उपलब्ध

नाशिक : पाच दशकांपासून नाशिकसह देशात वापरात असणाऱ्या थॉमसन, सोनाका, माणिकचमन, शरद सिडलेस अशा पारंपरिक वाणाच्या आधारे निर्यातक्षम द्राक्षांच्या खर्चीक उत्पादनावर सह्य़ाद्री फार्मर्स प्रोडय़ुसर कंपनीने तोडगा काढला आहे. देशात प्रथमच जगाच्या बाजारात मागणी असणारे ‘आरा’ हे वाण स्थानिक पातळीवर उपलब्ध केले आहे. आकाराने मोठे, हार्मोन्स देण्याची गरज नसलेले आणि आकर्षक रंगातील हे द्राक्ष वाण आहे. त्याच्या लागवडीतून निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन वाढेल. उत्पादन खर्चात कपात होऊन उत्पादकांच्या नफ्यात वाढ होईल, असा दावा दावा कंपनीने केला. पेटंटयुक्त हे वाण घेण्याकरिता पाच कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.

सह्य़ाद्री फार्मर्सचे प्रमुख विलास शिंदे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

आजवर नवीन वाण उपलब्ध होत नसल्याने देशात द्राक्षांच्या प्रचलित चार-पाच वाणांची लागवड होत आहे. जागतिक बाजारात १८ मिलिमीटरपेक्षा अधिक आकाराचे मणी असणाऱ्या द्राक्षांना पसंती मिळते. देशात सध्या उत्पादित होणारी द्राक्षे जगाच्या पसंतीक्रमात स्पर्धेतही नाही. प्रचलित वाणांद्वारे उत्पादन बरेच खर्चीक आहे. मण्यांचा आकार वाढविण्यासाठी हार्मोन्स द्यावी लागतात. त्याचे प्रमाण कमी अधिक झाल्यास नुकसान झाल्याची उदाहरणे आहेत. त्यासाठी कॅलिफोर्निया जातीचे आरा हे वाण भारतात आणण्यात आले आहे. या वाणाचे उत्पादन, विक्रीचे देशातील सर्वाधिकार शेतकऱ्यांच्या मालकीच्या सह्य़ाद्री फार्मर्सला मिळाले आहेत. या वाणाच्या लागवडीची नाशिक परिसरात ४० हेक्टर क्षेत्रात यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यातून उत्पादित झालेली द्राक्षे निर्यात करण्यात आली. पुढील वर्षांपर्यंत आराची तीनही रंगातील द्राक्ष निर्यातीसाठी उपलब्ध होणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

द्राक्ष व्यवसायात दरवर्षी सुमारे १३ ते १४ हजार कोटींची उलाढाल होते. त्यात एकटय़ा नाशिकमध्ये आठ हजार कोटींची उलाढाल होते. या माध्यमातून पाच लाख रोजगार उपलब्ध होतात. प्रचलित वाणांनी ५० वर्षे उत्पादकांना आधार दिला, परंतु द्राक्षशेतीत अडचणी वाढल्या. हार्मोन्सचे प्रमाण वाढल्यास चव बिघडते. नैसर्गिक आपत्तीत हे वाण तग धरू शकत नाही. यामुळे उत्पादक अनेकदा अडचणीत सापडतात. उष्णकटिबंधीय प्रदेशातही हे योग्य वाण असून त्या माध्यमातून हेक्टरी २७ ते ३५ टनपर्यंत उत्पादन होईल, असेही शिंदे म्हणाले.

अधिक उत्पादकता, कमी उत्पादन खर्च, निर्यातक्षम अशी वैशिष्टय़े असलेल्या ‘आरा’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘आरा’मुळे उत्पादन खर्चात सुमारे २० टक्के कपात होऊन उत्पादनात १० ते  १५ टक्के वाढ अपेक्षित आहे. एखाद्या फळपिकाच्या जागतिक वाणाचे देशातील सर्वाधिकार मिळविणारी सह्य़ाद्री फार्मर्स प्रोडय़ुसर कंपनी ही देशातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनी ठरली. आरा वाणाच्या स्थानिक पातळीवर घेण्यात आलेल्या चाचण्या यशस्वी ठरल्या असून २०२३ पर्यंत लागवडीखालील क्षेत्र दोन हजार हेक्टपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे.

– विलास शिंदे  (प्रमुख, सह्य़ाद्री फार्मर्स कंपनी)

First Published on July 4, 2019 3:54 am

Web Title: improving the productivity of grapes production of grapes zws 70