X

दिंडोरी तालुक्यात बिबटय़ांची दहशत

दिंडोरी तालुक्यातील कादवा, कोलवन नदी काठावरील सर्व गावे अनेक वर्षांपासून बिबटय़ांच्या दहशतीखाली आहेत.

डझनभर पिंजरे लावूनही सावज अडकेना

दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथे बिबटय़ाच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने कादवा, कोलवन नदीकाठ आणि परिसरातील गावांवरील बिबटय़ाची दहशत पुन्हा ठळकपणे समोर आली आहे. हा परिसर अनेक वर्षांपासून बिबटय़ाच्या दहशतीखाली आहे. आतापर्यंत बिबटय़ाने तीन बालकांचा बळी घेतला आहे. मध्यंतरी दोन बालके, महिलेवर हल्ला झाला होता. दैव बलवत्तर म्हणून ते वाचले. बिबटय़ांच्या मुक्त संचाराने वन विभागाने थोडेथोडके नव्हे, तर तब्बल ११ पिंजरे या भागात लावले. तथापि, सावज पिंजऱ्यात अडकले नाही. उलट त्याचा उच्छाद दिवसागणिक वाढत असल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत.

दिंडोरी तालुक्यातील पिंपळगाव केतकी, परमोरी, राजापूर, वरखेडा, लखमापूरसह आसपासच्या परिसरात सहा ते सात बिबटय़ांच्या वास्तव्यामुळे भीतीचे वातावरण आहे. परमोरी शिवारात ज्ञानेश्वर दिघे यांच्या शेतात ही घटना घडली. कुटुंबातील महिला शेतात काम करत असताना शेजारी लहान मुले खेळत होते. शेजारीत उसाच्या शेतातून येत बिबटय़ाने सार्थक ज्ञानेश्वर दिघे (तीन) याच्यावर हल्ला केला. त्याला उसाच्या शेतात ओढत नेले. ही घटना लक्षात आल्यावर सार्थकची आई, आजीने आरडाओरड केली. आसपासच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली. त्यांनी उसात शोध घेतला असता बिबटय़ा पळून गेला होता. जखमी सार्थकला तातडीने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तत्पुर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. आमदार नरहरी झिरवाळ यांनी वन विभागाला तातडीने बिबटय़ांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर आपला रोष प्रगट केला.

दिंडोरी तालुक्यातील कादवा, कोलवन नदी काठावरील सर्व गावे अनेक वर्षांपासून बिबटय़ांच्या दहशतीखाली आहेत. बिबटय़ांनी अनेकांची वासरे, कुत्रे आदी पाळीव प्राणी फस्त केले. बिबटय़ांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने डझनभर पिंजरे लावले आहे. मात्र बिबटे पिंजऱ्यात काही अडकले नाही. उलट त्यांचा उपद्रव वाढत आहे. बिबटय़ांची भीती कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. यापूर्वी बिबटय़ाच्या हल्ल्यात म्हेळुस्के येथील श्रीरंग हर्षवर्धन खिरकाडे आणि लखमापूर येथील विवेक बिंद या बालकांचा मृत्यू झाला होता.

ग्रामस्थांचा वन विभागावर ठपका

पिंजरे लावण्याकरिता त्याची परवानगी मिळविण्यासाठी मोठा द्राविडी प्राणायाम करावा लागतो. परमोरी ग्रामस्थांनी सातत्याने बिबटय़ाच्या बंदोबस्ताची मागणी केली होती. रविवारी एका वासरावर बिबटय़ाने हल्ला केला होता. त्याची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिली होती. मात्र त्यावर उपाययोजना झाल्या नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला. वन विभागाने आता तरी जागे होऊन बिबटय़ांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

वन विभागाकडून जनजागृती

बिबटय़ा हा नरभक्षक प्राणी नाही. त्याला जंगलात खाण्यासाठी काही नसल्याने तो नागरी वस्तीकडे आला आहे. ज्या गावांमध्ये बिबटय़ाची दहशत आहे, तिथे ग्रामसभेत जनजागृतीचे काम वन विभाग करत आहे. पाळीव प्राणी बंदीस्त गोठय़ात बांधावेत, गावात त्याला खाद्य मिळणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे. परिसरात उसाचे क्षेत्र अधिक आहे. यामुळे त्यांना लपण्यासाठी जागा भरपूर मिळते, याकडे दिंडोरीचे वनक्षेत्रपाल गणेश गांगुर्डे यांनी लक्ष वेधले.