24 September 2020

News Flash

कोरडय़ा रामकुंडासाठी टँकरद्वारे पाणी

नाशिकमधील रामकुंड १३९ वर्षांनंतर कोरडे; महापौरांच्या आवाहानाला प्रतिसाद

नाशिकमधील रामकुंड १३९ वर्षांनंतर कोरडे; महापौरांच्या आवाहानाला प्रतिसाद
तब्बल १३९ वर्षांनंतर कोरडेठाक पडलेल्या रामकुंडात पूर्वसंध्येपासून टँकर रिते होण्यास सुरूवात झाल्यामुळे नववर्षांच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या कुंडात बऱ्याच महिन्यानंतर प्रथमच काहिसे स्वच्छ पाणी पहावयास मिळाले. महापौर अशोक मुर्तडक यांनी केलेल्या आवाहनास शहरातील टँकर मालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे भाविकांना सहन करावा लागणारा त्रास कमी झाला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यातील प्रमुख पर्वण्यांवेळी भरभरून वाहणारे गोदापात्र दुष्काळामुळे जवळपास कोरडेठाक झाले. सिंहस्थात सोडलेल्या पाण्यामुळे उच्च न्यायालयाने ताशेरे मारून पुन्हा पाणी सोडण्यास प्रतिबंध केला. त्यातच, गंगापूर धरणामधून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यामुळे यंदा शेतीसह नाशिकमध्ये पाणी कपात करावी लागली. या एकंदर स्थितीत गंगापूर धरणापासूनचे गोदापात्र काही अपवाद वगळता पूर्णत: शुष्क झाले आहे. त्याचा त्रास अस्थी विसर्जनासाठी रामकुंडावर येणाऱ्या भाविकांना सहन करावा लागत होता. रामकुंडाची अवस्था साचलेल्या पाण्याच्या डबक्याप्रमाणे झाली. या ठिकाणी पूजाविधीसाठी दररोज शेकडो भाविक येतात. विधीवत पूजन करून या कुंडात स्नानही केले जाते. मात्र, रामकुंडासह गोदावरीच्या सध्याच्या स्थितीमुळे परिसरात कमालीची दरुगधी आहे.
१८७७ मध्ये रामकुंड या पध्दतीने कोरडे झाले होते. दुष्काळामुळे प्रदीर्घ कालावधीनंतर त्याची पुनरावृत्ती झाल्याचे लक्षात घेऊन महापौर अशोक मुर्तडक यांनी सामाजिक दायित्वातून टँकर मालकांनी विहिरी वा कुपनलिकेतून पाणी रामकुंडात टाकण्याचे आवाहन केले होते. त्यास संबंधितांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. गुरूवारी रात्रीपासून टँकरमधून पाणी रामकुंडात टाकण्यास सुरूवात झाली. शुक्रवारी दुपापर्यंत जवळपास २५ ते ३० टँकरद्वारे पाणी कुंडात सोडण्यात आल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या काही वर्षांंच्या इतिहासात दुष्काळी स्थितीतही रामकुंडात या पध्दतीने पाणी टाकण्याची वेळ आली नव्हती.

कूपनलिकेच्या कायमस्वरुपी पर्यायावर काम
दुष्काळामुळे रामकुंडात उद्भवलेल्या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी गोदावरीच्या पात्रात कूपनलिका खोदण्यासाठी भूगर्भ तज्ज्ञांकडून सर्वेक्षण करून लवकरच हे काम पूर्णत्वास नेण्याची तयारी महापालिकेने केली आहे. या संकल्पनेला गोदाप्रेमी नागरी सेवा समितीने विरोध दर्शविला असला तरी संबंधितांनी ज्या मुद्यावरून आक्षेप घेतला, त्यातील सत्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून पडताळली जाईल. तसेच कूपनलिका खोदण्यासाठी आजवर कुठे भूसुरुंगाचे स्फोट घडविले गेलेले नाहीत. त्यामुळे कूपनलिका खोदताना तसे काहीच करावे लागणार नसताना खोडा घालण्याच्या दृष्टिकोनातून विरोध केला जात असल्याच्या निष्कर्षांप्रत पालिका आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 12:46 am

Web Title: in drought hit maharashtra nashik sacred ramkund dries up for first time in 130 years
Next Stories
1 धोरणे चुकल्यास भाजपला घरी पाठवू!
2 देवळ्यात कुपोषित बालिका
3 नाशिकमध्ये तडीपार गुंडाचा खून
Just Now!
X