मालेगाव : सलग पाच दिवस करोना रुग्ण आढळून येण्याचा आलेख घसरल्याने शहरात एक प्रकारे आशादायी चित्र निर्माण झाले असतानाच मंगळवारी करोना रुग्णांच्या आलेखाने पुन्हा एकदा उसळी घेतली. एकाच दिवसात २९ रुग्ण आढळून आले असून त्यामुळे शहर, तालुक्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ६६५ झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील रुग्ण संख्या त्यामुळे ८३० वर पोहचली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये येथील सामान्य रुग्णालयातील एका डॉक्टरचा समावेश आहे.

तीन टप्प्यात मंगळवारी एकूण २०८ करोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले. त्यात १७९ रुग्णांचे अहवाल नकारात्मक असून २९ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले. या रुग्णांमध्ये सामान्य रुग्णालयातील ४८ वर्षांचा डॉक्टर, तालुक्यातील लोणवाडे येथील एका राजकीय पक्षाचे ५८ वर्षांचे कार्यकर्ते, आंबेडकर नगरमधील तीन वर्षांचा मुलगा, फुले मार्केटमधील चार वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.

नाशिकच्या वडाळा येथील एका ४५ वर्षांच्या पुरुषाचा अहवालही सकारात्मक आला आहे. गेल्या आठवडय़ात नव्याने आढळून येणाऱ्या करोना बाधित रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने घट होत असल्याचे आणि करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. गेल्या बुधवारी तालुक्यात एकूण ३६ नविन रुग्ण आढळून आले होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी हा आकडा १२ पर्यंत खाली आला. त्यानंतर हा आलेख रोजच घसरत राहिला. शुक्रवारी नऊ, शनिवारी आठ, रविवारी सात आणि सोमवारी तीन याप्रमाणे नवे रुग्ण आढळून आले. आता एकाच दिवसात २९ रुग्ण आढळून आल्याने मालेगावकरांची चिंता पुन्हा वाढली आहे.

कांदा वाहतूक करणारा चालक बाधित

पिंपळगावहून मुंबईत कांदा घेऊन जाणारा वडाळा भागातील मालमोटार चालक करोनाबाधित निघाला आहे. संबंधित व्यक्तीच्या घरी मध्यंतरी कोणीतरी मुंबईहून येऊन गेल्याचा संदर्भ आहे. संबंधित रुग्ण  पिंपळगाव बसवंत येथून कांद्याची मुंबईला वाहतूक करतो. बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज आहे. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तो जिल्हा शासकीय रुग्णालयात आला होता. त्याच्या नमुन्याचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्याच्या निवासस्थानाचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील माणेकशानगर, गंगापूर रस्त्यावरील ऋषिराज प्राईड, सिडकोतील हनुमान चौकातील प्रथम हॉस्पिटल आणि गंगापूर रस्त्यावरील देसले हॉस्पिटल या प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध हटविण्यात आल्याचे पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी म्हटले आहे.

दूध विक्रीतील बेपर्वाई भोवली ?

काही दिवसांपूर्वी चाळीसगाव फाटा भागात दूध विक्री करणारे तीन-चार शेतकरी आणि दूध खरेदीसाठी मालेगावातून गेलेल्या काही लोकांची एक चित्रफित समाज माध्यमांमध्ये फिरली होती. दूध देता-घेतांना शेतकरी तसेच ग्राहकांना सामाजिक अंतर पाळण्याचे कुठलेही भान नसल्याचे या चित्रफितीत दिसत होते. तसेच करोनासंबंधी कुठलीच पर्वा नसल्याचा त्यांचा वावर अधोरेखित करत होता. त्यामुळे अशा या बेपर्वाईमुळे भविष्यात धोका निर्माण होऊ  शकतो, अशी भीती त्याचवेळी अनेकांनी व्यक्त केली होती. शहराजवळील लोणवाडे येथील राजकीय पक्षाच्या एका कार्यकर्त्यांस करोना संसर्ग झाल्याचे आढळून येणे आणि आता ‘त्या‘ चित्रफितीतील दूध विक्री करणारे शेतकरी हे लोणवाडे येथील असल्याची प्राप्त होणारी माहिती यामुळे लोकांची त्यावेळची भीती खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लोणवाडे येथील बाधित व्यक्तीच्या कुटुंबातील नऊ  सदस्यांचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले असून त्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.