मालेगाव : सध्याच्या घडीला शहरात करोना संसर्ग नियंत्रणात असला तरी या विषाणूविरोधात लढणारी प्रतिपिंड (अँटिबॉडीज्) किती जणांच्या शरीरात तयार झाली आणि नेमक्या किती लोकांना आतापर्यंत या विषाणूचा संसर्ग झाला आहे, याची उकल करण्यासाठी महापालिका आणि भारतीय जैन संघटना यांच्या  वतीने ‘सिरो’ तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत ११ दिवसांत शहरातील एकूण सात हजार जणांची तपासणी होणार आहे.

एप्रिल, मे महिन्यांत मालेगाव शहर उत्तर महाराष्ट्रात सर्वात आधी करोनाचे केंद्र बनले होते. तुलनेने सध्या रुग्णसंख्येचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र दिसत असतानाच हा संसर्ग होऊन अनेक जण अनभिज्ञपणे बरे झाल्याचाही अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, होणाऱ्या या ‘सिरो’ तपासणीमुळे ‘हर्ड इम्युनिटी’ तयार झालेल्या लोकांचे प्रमाण समजणार असल्याने शहरातील किती टक्के लोकांना हा संसर्ग होऊन गेला असावा याचा आडाखा बांधणे शक्य होणार आहे. महापौर ताहेरा रशीद शेख यांच्या हस्ते येथील वाडिया रुग्णालयात सिरो तपासणी मोहिमेस सोमवारी सुरुवात करण्यात आली. ७ ते १७ सप्टेंबर या कालावधीत चालणाऱ्या या मोहिमेत पहिल्या टप्प्यात आरोग्य, महापालिका, आशा, अंगणवाडी सेविका अशा १५०० कर्मचाऱ्यांची ही तपासणी करण्यात येईल. त्यानंतर प्रतिबंधित क्षेत्रातील दोन हजार आणि बिगरप्रतिबंधित क्षेत्रातील साडेतीन हजार जणांची तपासणी करण्यात येणार आहे. माजी महापौर रशीद शेख यांची प्रथम तपासणी करण्यात आली. त्यानंतर उपायुक्त नितीन कापडणीस, साहाय्यक आयुक्त तुषार आहेर, आरोग्याधिकारी डॉ. गोविंद चौधरी, डॉ. सपना ठाकरे, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रय काथेपुरी यांची तपासणी करण्यात आली.

शहरातील एकूण १४ नागरी आरोग्य केंद्रांतर्गत ही तपासणी केली जाणार आहे. करोना उपचार व्यवस्थापन करण्यासाठी ही तपासणी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने रक्त नमुना देऊन शहरवासीयांनी ही तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापौर ताहेरा शेख यांनी मोहिमेचा प्रारंभ करताना केले.