नाशिक : टाळेबंदीचे निर्बंध शिथील करण्याच्या दिशेने पावले टाकली जात असून त्या अंतर्गत शहरातील सर्व दुकाने रात्री आठपर्यंत तर, हॉटेल आणि मद्यालये रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. दुकानांमध्ये मुखपट्टीविना ग्राहक आल्यास त्यास माल विक्री करू नये, अन्यथा कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

शनिवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नाशिकमध्ये करोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचे नमूद केले. करोनाच्या नियमावलीचे पालन करून हळूहळू सर्व व्यवहार सुरू केले जात आहेत. अलीकडेच शासनाने हॉटेल, मद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली. त्यांची वेळमर्यादा वाढविण्यात आली आहे. प्रशासनाने सकाळी सात ते सायंकाळी सात ही वेळ निश्चित केली होती. परंतु, ती गैरसोयीची असल्याने अनेक मद्यालय चालकांनी ती वाढवून देण्याची मागणी केली होती. बैठकीत या मुद्यावर चर्चा होऊन सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याचे भुजबळ यांनी सांगितले. शहरातील अन्य दुकानदारांना दुकाने सुरू ठेवण्यास वेळ वाढवून देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसाय रात्री आठपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली. सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, व्यापाऱ्यांसह नागरिकांनाही त्याचा लाभ होईल. दुकाने खुली ठेवण्याचा कालावधी वाढविला गेला असला तरी दुकानांमध्ये गर्दी होणार नाही याची जबाबदारी व्यावसायिक, व्यापाऱ्यांची आहे. ग्राहकाने मुखपट्टी परिधान केली नसल्यास त्याला मालाची विक्री करू नये. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित दुकानदाराविरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा भुजबळ यांनी दिला. बँडवाल्यांनाही सुरक्षित अंतर ठेवून परवानगी देण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.