News Flash

शहरांमध्ये ऑनलाइन शिक्षणाचा गवगवा, तर ग्रामीण भागात विद्यार्थी विविध कामांमध्ये व्यस्त 

ग्रामीण आणि आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून दूर;

शहरांमध्ये ऑनलाइन शिक्षणाचा गवगवा, तर ग्रामीण भागात विद्यार्थी विविध कामांमध्ये व्यस्त 

ग्रामीण आणि आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून दूर; जुने भ्रमणध्वनी शाळांमध्ये जमा करण्याचे आवाहन   

चारूशीला कुलकर्णी, लोकसत्ता

नाशिक : नवीन शैक्षणिक वर्षांचा श्रीगणेशा ‘ऑनलाइन’ पध्दतीने झाला असला तरी हे ऑनलाइन शिक्षण भारत आणि इंडिया यांच्यातील दरी अधिक खोल करत असल्याचे चित्र जिल्ह्य़ात दिसत आहे. शहरातील मुले ऑनलाइन शिक्षणात गुंतली असतांना ग्रामीण विशेषत खेडे, आदिवासी दुर्गम भागात ऑनलाइन शिक्षणाचे वारे अद्याप पोहचले नाही. परिणामी मुलांच्या हातात भ्रमणध्वनीऐवजी वेगवेगळी साधने असून ते कामांमध्ये व्यस्त आहेत.

यंदा मार्च महिन्यात आलेला करोना आजाराचा संसर्ग पाहता शाळा, महाविद्यालये सध्या बंद आहेत. यामुळे परीक्षा रद्द, पोषण आहार वितरण, निकाल, नव्या शैक्षणिक वर्षांचे  शैक्षणिक शुल्क, अभ्यासक्रम अशा गुंत्यामध्ये शिक्षण विभाग अडकला आहे. करोनाच्या सावटाखाली ऑनलाइन पध्दतीने नव्या शैक्षणिक वर्षांचा श्रीगणेशा झाला असला तरी जिल्ह्य़ातील बहुतांश शाळांनी या शिक्षणाकडे पाठ फिरवली आहे.

शहर परिसरात पालकांनी ऑनलाइन शिक्षणाचे दणक्यात स्वागत करत मुलांना भ्रमणध्वनी, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आदी साधने उपलब्ध करून दिली. ग्रामीण भागात विशेषत खेडय़ांमध्ये, गावात पालकांकडे साधे भ्रमणध्वनी आहेत. पालक वर्ग बहुतांश शेती व्यवसायाशी संबंधित असून शेतकरी, शेतमजुर यात विभागला गेला आहे. नोकरदार असलेल्या सात टक्के पालकांनी आपल्या पाल्यांना आवश्यक सुविधा दिल्या असल्या तरी शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांची परिस्थिती अतिशय बिकट आहे.

पालकांकडे स्मार्ट भ्रमणध्वनी नसल्याने या मुलांच्या शिक्षणाचा मार्ग खुंटला आहे. जिल्हा परिषद शाळा, शासकीय शाळांकडून अशा शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांसाठी शहरी भागातून जुने भ्रमणध्वनी जवळच्या शाळांमध्ये जमा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. दुसरीकडे, कुठलीच सुविधा नसल्याने या मुलांनी घरीच बसणे, मित्रांसोबत दंगा मस्ती सुरू केली आहे.

शेतमजूर असलेल्या पालकांच्या मुलांची परिस्थिती बिकट आहे. शेतमजूर किंवा अन्य रोजंदारीवरील मजुरांचे करोनामुळे लागु झालेल्या टाळेबंदीत काम सुटले. कोणीही नवीन काम द्यायला तयार नाही. काम पुरेशा प्रमाणात सुरू न झाल्याने जुना मालक कामावर घेत नसल्याने अशा कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. शेतमजूर, आर्थिकदृष्टया मागास वर्गातील हे विद्यार्थी आपल्यासह कुटूंबातील अन्य सदस्यांचा उदरनिर्वाह सुरळीत व्हावा, पुढील शिक्षणाची काही तजवीज व्हावी यासाठी वेगवेगळ्या कामांमध्ये व्यस्त आहेत. अंडी विकणे, जनावरे चारण्यासाठी माळरानावर नेणे, आई-वडिलांसोबत मजुरीला जाणे, घरी राहून लहान्यांची जबाबदारी घेत कुटूंबातील अन्य घरकामात गुंतणे, अशी कामे त्यांच्याकडून होत आहेत.

शासनाकडून दिला गेलेला पोषण आहार टाळेबंदीच्या पहिल्याच टप्प्यात संपल्याने बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत आहे. सद्यस्थितीत या बालकांना एक वेळचे जेवण मिळणे मुश्किल आहे.  या बालकांमध्ये नजीकच्या काळात कुपोषण मोठय़ा प्रमाणावर आढळेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

कुपोषण वाढण्याची भीती

ऑनलाइन शिक्षणापासून गरीब घरातील मुले वंचित आहेत. त्यांचा अभ्यास नियमीत वर्ग सुरू झाल्यावर जादा तासिका घेत पूर्ण करण्यात येईल. अभ्यास वेळेतच पूर्ण केला जाईल. त्यासाठी शाळा अशा बालकांसाठी प्रयत्नशील आहेत. परंतु, शिक्षणापेक्षा या बालकांच्या आरोग्याचे नुकसान मोठय़ा प्रमाणावर होत आहे. पोषण आहार मिळत नाही. कुटूंबातील कर्त्यां पुरूषाची तुटपुंजी कमाई यामुळे या विद्यार्थ्यांच्या जेवणाचे हाल होत असल्याने कुपोषणाची समस्या निर्माण होईल.

– एस. बी. देशमुख (सचिव, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ)

२३०० शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण

जिल्ह्यातील २३०० शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. ज्या आदिवासी भागात ऑनलाइन शिक्षणप्रणाली प्रभावीपणे पोहचू शकत नाही, तिथे शिक्षकांनी स्वत: जाऊन विविध उपाय योजनेद्वारे कसे शिक्षण देता येईल, याचा प्रयत्न करावा. तसेच ग्रामीण भागात ज्या विद्यार्थ्यांकडे भ्रमणध्वनीची व्यवस्था नाही, अशा विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचावे यासाठी शिक्षक मित्र, गल्ली मित्र संकल्पना राबविण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 1:21 am

Web Title: in rural areas students are engaged in various activities zws 70
Next Stories
1 मागणी घटल्याने कांदा उत्पादकांची कोंडी
2 मागणी घटल्याने कांदा उत्पादकांची कोंडी
3 ‘आरटीई’ अंतर्गत जिल्ह्य़ात १४१ विद्यार्थ्यांचा प्रवेश
Just Now!
X