‘मेक इन इंडिया’ अंतर्गत नौदलातर्फे आयात केल्या जाणाऱ्या सामग्रीस पर्याय म्हणून देशांतर्गत उत्पादनास प्रोत्साहन देणे आणि त्याकरिता खासगी क्षेत्रातील उद्योगांशी समन्वय साधत स्वयंपूर्णता साधणे, या उद्देशाने नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा) अभिनव उपक्रम हाती घेत आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता निमा हाऊस येथे नौदलविषयक उद्योगांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

मेक इन नाशिक उपक्रमाअंतर्गत निमातर्फे सातत्याने शहरात मोठी औद्योगिक गुंतवणूक व्हावी आणि उद्योग व्यवसाय वाढीस संधी उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न होत आहे. त्या अंतर्गत हा उपक्रम घेण्यात येत आहे.

कार्यक्रमास नौदलातर्फे रिअर अ‍ॅडमिरल व्ही. एम. डॉस, कोमोडर एन. बालकृष्णन् तसेच नौदलाचे गोवा, मुंबई आणि कोची येथील वरिष्ठ अधिकारी, निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मेक इन नाशिक समितीचे अध्यक्ष श्रीकांत बच्छाव आदी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमात विक्रेता नोंदणीसाठी प्रक्रिया, सद्य:स्थितीत कोणकोणत्या बाबतीत देशांतर्गत उत्पादनाची आवश्यकता आहे याची माहिती देण्यात येणार आहे. नौदलातर्फे याविषयी माहितीपूर्ण सादरीकरण करण्यात येणार आहे. शहरातील उद्योग क्षमता, जिल्ह्य़ातील उद्योगांसाठी अनुकूल बाबी लक्षा घेता या उपक्रमाच्या माध्यमातून नाशिकमधील उद्योगांना व्यवसाय वाढीच्या चांगल्या संधी प्राप्त होतील, असा विश्वास बॅनर्जी यांनी व्यक्त केला.