News Flash

त्र्यंबकमधील ‘प्राप्तीकर’च्या कारवाईचा तपशील गुलदस्त्यात

सलग ४० तासाहून अधिक काळ सुरू असलेली कारवाई मंगळवारी सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होती.

दोन पुरोहितांच्या निवासस्थानी तपास पूर्ण

नारायण नागबळी. कालसर्प शांती. त्रिपिंडी यासह पितृदोष निवारणासाठी करण्यात येणाऱ्या विविध पूजांसाठी भाविकांच्या मनात श्रध्दास्थान असलेले तसेच बारा ज्योतिर्लिगापैकी एक असणारे त्र्यंबकेश्वर मंदिर हे क्षेत्र प्राप्तीकर विभागाच्या तपासणीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दोन पुरोहितांच्या घरात सलग दोन दिवस चाललेली ही छाननी मंगळवारी रात्री उशिरा संपुष्टात आली. मात्र या तपासणीत काय आढळले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राप्तीकर विभागाने नेहमीप्रमाणे मौन बाळगल्याने कारवाईचा अहवाल गुलदस्त्यातच आहे. ही कारवाई संपुष्टात आल्याने धास्तावलेल्या अन्य पुरोहितांचा जीव भांडय़ात पडला आहे.

देशात काही विशिष्ट पूजाविधींसाठी एकमेव ठिकाण म्हणून गणल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वरमधील पुरोहितांच्या गर्भश्रीमंतीविषयी बरीच चर्चा होत असते. नोटा बंदीनंतर प्राप्तीकर विभागाची त्र्यंबकवर नजर पडली. देवस्थानच्या उत्पन्नाची शहानिशा करण्यापेक्षा येथील दोन पुरोहितांच्या निवासस्थानी छापे टाकून कागदपत्रांची छाननी सुरू केल्याने परिसरात खळबळ उडाली. सलग ४० तासाहून अधिक काळ सुरू असलेली कारवाई मंगळवारी सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होती. यामध्ये मेनरोडवरील एक आणि नगरपालिका रस्त्यावरील एक अशा दोन कुटुंबियांच्या आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे तपासणीला अधिकाऱ्यांनी सुरूवात केली. त्यात गणेश विद्याधर चांदवडकर आणि गणपती शिखरे यांचा समावेश होता. संबंधित कुटुंबियांकडून ऑनलाईन पूजेची नोंदणी केली जाते असून पिढय़ानपढय़ा संबंधितांकडून पौराहित्याचा व्यवसाय सुरू आहे. याशिवाय अन्य क्षेत्राशी संबंधित त्यांचे अनेक व्यवसाय व प्रचंड मालमत्ता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तपासणी वेळी या ठिकाणी कोणालाही प्रवेशास मज्जाव करण्यात आला. उशिरापर्यंत दोन्ही घरांमध्ये कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. या घडामोडींमुळे नागरिकांमध्ये कुतहुल तर पुरोहित वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तपासणीत नेमके काय आढळले याची स्पष्टता प्राप्तीकरच्या अधिकाऱ्यांनी केली नाही. ही कारवाई झाल्यावर पुरोहितांवर छापे पडत असल्याची धास्ती सर्वामध्ये पसरली. मात्र, काही पुरोहितांना बजावलेल्या नोटीसा वगळता फार काही घडले नसल्याने इतरांची धास्ती कमी झाली.

बुधवारी गावातील दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले. पूजा विधी व तत्सम कामे रुळावर येत असली तरी प्राप्तीकरच्या कारवाईत नेमके काय आढळले याची चर्चा सुरू होती. नाशिक येथील कारवाईत या विभागाने माहिती देणे टाळले होते. कारवाईची माहिती जाहीर केली जात असल्याने संभ्रमात भर पडली. त्र्यंबकेश्वरच्या कारवाईत या विभागाने तोच कित्ता गिरवल्याचे पहावयास मिळाले. या प्रकारामुळे पुरोहित वर्गाने धडा घेतला असून भविष्यात असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी सर्व पुरोहितांना एकत्रित करत त्यांना नियमित कर भरण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच कॅशलेस व्यवहार कसे करावेत यासाठी कुठले पर्याय वापरावे, कर भरतांना काही अडचणी असल्यास तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन पर व्याख्यान लवकरच घेण्यात येणार आहे. नारायण नागबळी मध्ये पुजेचे दर वेगवेगळे आहेत मात्र त्यात कोणाची फसवणूक किंवा लुबाडणूक होत नसल्याचे पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 1:53 am

Web Title: income tax complete investigation of trimbakeshwar temple two priests
Next Stories
1 छबु नागरेची एकाच बँकेत नऊ खाती
2 नाशिकही ‘लेझर’च्या दुनियेत
3 संरक्षण राज्यमंत्र्यांकडून अधिकारी फैलावर
Just Now!
X