मागील वर्षीच्या कारवाईत १०० कोटींची करचोरी उघडकीस आणल्यानंतर प्राप्तिकर विभागाने देशांतर्गत कांद्याचे वाढणारे भाव लक्षात घेऊन पुन्हा एकदा आपला मोर्चा कांदा व्यापाऱ्यांकडे वळविला आहे. लासलगाव, पिंपळगाव परिसरातील १२ व्यापाऱ्यांच्या आस्थापनांवर बुधवारी छापे टाकून आर्थिक व्यवहारांची पडताळणी सुरू करण्यात आली.
संबंधितांकडील कांदा साठय़ाची माहिती घेतली जात आहे. कर चोरीच्या संशयावरून ही कारवाई झाल्याचे प्राप्तीकर विभागाने म्हटले आहे. वारंवार होणाऱ्या कारवाईच्या विरोधात व्यापारी लिलाव बेमुदत बंद पुकारण्याच्या तयारीत आहेत.
कांदा दरात वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, मध्यंतरी केंद्र सरकारने अकस्मात निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केला. या विरोधात उत्पादकांसह व्यापारी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. नंतर केंद्राने कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कांदा निर्यातीला परवानगी दिली. पण महाराष्ट्रातील कांद्याला डावलले.
या घटनाक्रमात कांद्याचे भाव मात्र कमी झाले नाहीत. बुधवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी प्रति क्विंटल ४३०० रुपये दर मिळाला. कृत्रिम टंचाई निर्माण करून व्यापारी दर वाढवितात, असा संशय नेहमी व्यक्त केला जातो. हा धागा पकडून प्राप्तीकर विभागाने संबंधितांनी खरेदी केलेला, चाळीत साठवलेला आणि विक्री केलेल्या व्यवहारांची पडताळणी लासलगाव, पिंपळगाव परिसरातील १२ जणांवर छापे टाकून सुरू केली. त्यास प्राप्तीकर विभागाच्या नाशिक विभागाचे प्रमुख अमितकुमार सिंग यांनी दुजोरा दिला.
मागील वर्षी कर चोरीच्या संशयावरून अनेक कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकले होते. त्यामध्ये १०० कोटींच्या व्यवहारात करचोरी झाल्याचे निष्पन्न झाले होते. सध्या कांद्याचे भाव उंचावत आहेत. व्यापाऱ्यांकडील मालाची साठवणूक आणि व्यवहारांची पडताळणी केली जाईल. कर चोरीच्या संशयावरून ही कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मागील काही वर्षांपासून कांदा दरवाढ झाली की, प्राप्तीकर विभाग लक्ष्य करत असल्याची व्यापारी वर्गाची भावना आहे. वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून व्यापारी लिलाव बेमुदत बंद करण्याच्या विचारात असल्याचे सांगितले जाते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2020 12:10 am