01 March 2021

News Flash

कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर छापे

११ व्यापाऱ्यांच्या आस्थापनांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकल्याने व्यापारी वर्गात घबराट पसरली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

महानगरांमध्ये कांद्याचा भाव गगनाला भिडल्यानंतर नफेखोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध प्राप्तिकर विभागाने पुन्हा एकदा कारवाईचे अस्त्र उगारले आहे. सोमवारी लासलगाव, पिंपळगाव बसवंत आणि येवला भागातील ११ व्यापाऱ्यांच्या आस्थापनांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकल्याने व्यापारी वर्गात घबराट पसरली आहे.

किरकोळ बाजारात कांद्याचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. शिवाय, व्यापाऱ्यांना कांदा साठवणुकीस मर्यादा घातली. निर्यातबंदीनंतर कोसळलेले दर उन्हाळ कांद्याची आवक घटल्यावर पुन्हा वाढले. परतीच्या पावसाने नव्या कांद्याचे मोठे नुकसान झाले. त्याचे आगमन लांबणीवर पडले. सध्या बाजारात नवा लाल कांदा येत असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. या एकंदर स्थितीत घाऊक बाजारात सरासरी दराने पाच हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. या दरवाढीमागे व्यापाऱ्यांचा हात असल्याचा केंद्र सरकारला संशय आहे. दोन वर्षांपूर्वी कांदा दर वाढल्यानंतर प्राप्तिकर विभागाने व्यापाऱ्यांवर छापे टाकले होते. त्याची पुनरावृत्ती सोमवारी पुन्हा एकदा झाली. प्राप्तिकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने या कारवाईमागे कांदा दरातील वाढ हेच कारण असल्याचे मान्य केले. लासलगाव येथील नितीन जैन, जैन सुरेशचंद्र, अजित भंडारी, प्रवीण कदम, अटल रमेशचंद्र यांच्यासह एकूण ११ व्यापाऱ्यांच्या आस्थापनांवर छापे टाकले. कारवाईत प्राप्तिकर विभागाची २० पथके आणि १०० अधिकारी सहभागी झाले आहेत. बाजारात प्रतिक्विंटल किमान २५०० ते कमाल ५७७२ रुपये दर आहे. कमी दरात खरेदी केलेला उन्हाळ कांदा व्यापारी साठवणूक करून नंतर वारेमाप भावाने विकून नफेखोरी करतात, असा संशय आहे. त्याअनुषंगाने संबंधितांच्या व्यवहारांची चौकशी सुरू असून मंगळवारी हे काम सुरू राहील, असे प्राप्तिकरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कारवाईच्या दिवशी लासलगाव बाजारात २०५४ क्विंटल उन्हाळ, तर १४९ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 1:34 am

Web Title: income tax department raids on onion traders abn 97
Next Stories
1 स्थानिक राजकारणाची दिशा बदलणार
2 बिबटय़ाच्या हल्ल्यात मुलगा जखमी
3 कोष्टी टोळीच्या म्होरक्यासह साथीदार तडीपार
Just Now!
X