|| अनिकेत साठे

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत : – पिकांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यासाठी दबाव वाढत असताना पुरेशा मनुष्यबळाअभावी यंत्रणेची दमछाक होत आहे. हे काम जलदपणे करण्यासाठी आता कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, कृषी संशोधन केंद्रातील कर्मचारी यांचे सहाय्य घेण्यात आले आहे. त्यांच्या मदतीने धुळे, नगर आणि जळगाव जिल्ह्य़ात हे काम विहित वेळेत पूर्णत्वास नेण्याची धडपड आहे. नाशिक जिल्ह्य़ात मात्र संबंधितांना प्रशिक्षण देण्यात वेळ जाईल, म्हणून तो पर्याय स्वीकारला गेला नाही. अतिशय कमी क्षेत्राचे पंचनामे करावयाचे असूनही नंदुरबार मागे पडला आहे. नगरमध्ये हे काम संथ आहे.

अवकाळी पावसाने नाशिक विभागात १६ लाख ३६ हजार २८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. हे काम जलदपणे पूर्णत्वास  नेण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर पंचनाम्याबाबत सकाळ, सायंकाळ आढावा घेतला जात आहे. या कामात जळगाव आघाडीवर असून त्या खालोखाल नाशिक, धुळे, नंदुरबार आणि नगरचा क्रमांक आहे. नंदुरबार आणि नगर जिल्ह्य़ात हे काम संथ आहे. नंदुरबारमध्ये पंचनाम्याचे क्षेत्र केवळ ८८१ हेक्टर आहे. तरीदेखील प्रगती समाधानकारक नाही. जळगावमध्ये सहा लाख १३११, नाशिकमध्ये तीन लाख ८६२, नगर तीन लाख ६४ हजार १४, धुळ्यात तीन लाख ६९ हजार २१४ इतक्या क्षेत्राचे पंचनामे शुक्रवापर्यंत पूर्ण करावयाचे आहेत.

या कामात अपुऱ्या मनुष्यबळाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जळगाव वगळता अन्यत्र अद्याप निम्मे काम झालेले नाही. विभागीय महसूल आयुक्त कार्यालय दैनंदिन आढावा घेत आहे. संथ काम असणाऱ्या जिल्ह्य़ांना सूचना देण्यात आल्याचे उपायुक्त (महसूल) दिलीप स्वामी यांनी सांगितले. हे काम लोकसहभाग अर्थात ग्रामस्थांच्या मदतीने करावे. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी दौरे वाढवून आढावा घ्यावा. ग्रामपातळीवर पंचनाम्याबाबत खातरजमा करावी. तालुकास्तरीय कार्यालयात तक्रार निवारण कक्ष स्थापून पिकांच्या नुकसानीच्या तक्रारी गंभीरपणे हाताळण्यास सांगण्यात आले आहे.

अधूनमधून पाऊस झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना शेतापर्यंत जाण्यास विलंब झाला. काही ठिकाणी पिके पाण्याखाली आहेत. कर्मचारी चिखलमय शेतात जाण्यास उत्सुक नसतात. पंचनाम्याचे क्षेत्र जिल्हानिहाय किमान तीन लाख ते कमाल सहा लाख हेक्टपर्यंत आहे. विस्तृत क्षेत्राचे पंचनामे शुक्रवापर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले गेले. अपुऱ्या मनुष्यबळात हे काम मुदतीत होईल की नाही, याबद्दल साशंकता आहे. जादा मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी शासकीय अनुदान ज्या कृषी महाविद्यालय, संस्थांना दिले जाते, त्यांचे विद्यार्थी, कर्मचारी यांची मदत घेण्याचा पर्याय पुढे आला. जळगाव, धुळे, नगरमध्ये त्यांच्या मदतीने हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे स्वामी यांनी सांगितले

मनुष्यबळाचा तुटवडा

पंचनामे करण्याची मुख्य जबाबदारी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी पर्यवेक्षक यांच्यावर आहे. एका तलाठी सजेत पाच ते सहा गावे असतात. त्या सर्व गावांची जबाबदारी तलाठय़ावर आहे. काही गावांतील ग्रामसेवकांकडे अन्य गावांचा अतिरिक्त कार्यभार आहे. कृषी पर्यवेक्षकांची वेगळी स्थिती नाही. एक व्यक्ती, एका वेळी एकाच गावात पंचनामे करू शकते. यामुळे आसपासच्या गावांतील नुकसानग्रस्त शेतकरी नाराज होतात. यामुळे यंत्रणा आमच्या गावात पंचनामे करत नसल्याच्या तक्रारी होत आहेत.

नाशिकचा अपवाद

जळगाव, धुळे, नगरमध्ये कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, कृषी संशोधन केंद्रातील कर्मचारी यांच्या मदतीने पंचनामे जलदपणे करण्याचा प्रयत्न आहे. एक दिवसीय प्रशिक्षण देऊन त्यांचे साहाय्य घेतले गेले. नाशिकमध्ये मात्र तो पर्याय निवडला गेला नाही. कृषी सहाय्यकांची कमतरता असली तरी प्रत्येकाला दोन-तीन गावांची जबाबदारी सोपविण्यात आली. विद्यार्थ्यांची मदत घ्यायची झाल्यास त्यांना प्रशिक्षण देण्यात वेळ जाईल. यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर हे काम प्रगतिपथावर असल्याचे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.