15 July 2020

News Flash

टाळेबंदीत ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ

टाळेबंदीत बाहेर फिरणे बंद झाल्याने समाज माध्यमात सक्रिय झालेल्यांची संख्या वाढली.

(संग्रहित छायाचित्र)

नाशिक : टाळेबंदीत अनेक जण घरात अडकल्याने ऑनलाइन उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या संधींचा शोघ घेण्याच्या नादात  ५० हून अधिक जणांची ऑनलाइन फसवणूक झाली आहे. एकूण २१,४०,००० रुपये लंपास करण्यात आले. नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी तक्रारींचा पाठपुरावा करत चार लाखाहून अधिक रक्कम तक्रारदारांना मिळवून दिली आहे.

टाळेबंदीत बाहेर फिरणे बंद झाल्याने समाज माध्यमात सक्रिय झालेल्यांची संख्या वाढली. व्यवसायाशी संबंधित नव्या कल्पना तसेच जुन्या मित्र-मैत्रिणींबरोबर समाज माध्यमांव्दारे गप्पांना वेळ देण्यात येऊ लागला. दुसरीकडे सायबर गुन्हेगारांनी या संधीचा फायदा घेत नागरिकांना कर्ज मिळवून देतो, ऑनलाइन नोकरी देतो, सोडत लागली आहे, असे निमित्त पुढे करीत ऑनलाइन फसवणुक सुरू केली. नाशिक जिल्ह्य़ात सायबर ग्रामीण पोलिसांकडे यांसदर्भात ५७ तक्रारी प्राप्त झाल्या. एकूण २१ लाख ४० हजार रुपये ऑनलाइन पध्दतीने लंपास करण्यात आले. या तक्रारींचा तपास करीत सायबर ग्रामीणने चार लाख ४७ हजार रुपये तक्रारदारांना मिळवून दिले.

समाज माध्यमांचा वापर करीत अफवा, खोटी बातमी, समाजात तेढ निर्माण करणारे संदेश देणाऱ्या संशयितांवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी ‘सोशल मीडिया सेल’ च्या माध्यमातून लक्ष केंद्रित केले आहे. करोना संसर्गजन्य आजाराविषयी समाज माध्यमांवर अफवा, खोटी बातमी पसरविणाऱ्या संशयितांविरूध्द वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये १८ गुन्हे दाखल असून ३२ संशयितांना अटक करण्यात आली आहे. तसेच नाशिक ग्रामीण जिल्ह्य़ातील विविध ठिकाणच्या मद्य दुकानांचे बनावट फेसबुक पान तयार करून ऑनलाइन मद्यविक्रीचा संदेश टाकणाऱ्या पाच तक्रारी प्राप्त झाल्या. त्यावर तत्काळ कारवाई करून बनावट फेसबुक पान बंद करण्यात आले.

नागरिकांनी कोणत्याही प्रकारे फसवणूक झाल्यास जवळील पोलीस ठाणे किंवा सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी ०२५३-२२०००४०८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी केले आहे.

सीमकार्ड सुरू करण्याच्या बहाण्याने साडेआठ लाखांची फसवणूक

आयडिया कंपनीचे सीमकार्ड फोर जीमध्ये सुरू करून देण्याची बतावणी संशयिताने राकेश आहेर (४२, रा. अंबड लिंक रोड) यांना केली. संशयिताने यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या खाते क्रमांकाचा ऑनलाइन उपयोग करून घेत खात्यामध्ये असलेली शिल्लक रक्कम, मे महिन्याचा पगार आणि ऑनलाइन पध्दतीने मंजूर झालेल्या वैयक्तीक कर्जाची रक्कम असे आठ लाख ४९ हजार ५७८ रुपये काढून घेतले. या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आहेर यांनी सायबर पोलीस ठाण्यात संशयिताविरूध्द गुन्हा दाखल केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 3:00 am

Web Title: increase in the incidence of online fraud in lockdown zws 70
Next Stories
1 नाशिक विभागात रुग्ण संख्या बावीसशेच्या दिशेने
2 Coronavirus : नाशिक विभागात रुग्ण संख्या बावीसशेच्या दिशेने
3 Coronavirus : नाशिक जिल्ह्यात ४८ तासांत करोनाचे १५९ नवे रुग्ण
Just Now!
X