सरकारी रुग्णालय म्हणजे शस्त्रक्रियेविना प्रसूतीची निश्चित हमी असे म्हटले जात असे. परंतु, काही वर्षांत जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी शस्त्रक्रियेसह इतर आजारांवरील शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले आहे. आकडय़ांच्या या फुगवटय़ास महापालिका आरोग्य विभागातील रिक्त पदांचा हातभार लागत आहे. परिणामी जिल्हा शासकीय रुग्णालयावरील ताण वाढत आहे.

आजारपणासाठी आर्थिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबीयांकडून जवळच्या महापालिका, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालयाचा रस्ता वेगवेगळ्या उपचारांसाठी धरला जातो. विशेषत प्रसूतीसाठी खासगी दवाखान्यात होणारा खर्च, शस्त्रक्रियेच्या नावाखाली होणारी लूट पाहता प्रसूतीसाठी बऱ्याचदा सरकारी रुग्णालय हा एकमेव पर्याय स्वीकारला जातो. परंतु, काही वर्षांतील आकडेवारी पाहता त्या ठिकाणीही चित्र बदलले आहे. जिल्हा रुग्णालयात गरोदरपणातील गुंतागुंतीच्या प्रकरणात शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला जात असल्याने या ठिकाणी शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढले असल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकडॉ. निखिल सैंदाणे यांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयात प्रसूतिपूर्व, प्रसूती दरम्यान आणि प्रसूती पश्चात वेगवेगळ्या सेवा सुविधा दिल्या जातात. नवजात शिशूंसाठी ३६ खाटांचे ‘एसएनसीयू’ आहे. या ठिकाणी आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांना मोफत, तर अन्य लोकांना नाममात्र शुल्कात सेवा दिली जाते. त्यामुळे अनेकांची पसंती शस्त्रक्रिया किंवा नैसर्गिक प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयाला आहे. वैद्यकीय सेवेचा दर्जा चांगला असल्याचे डॉ. सैंदाणे म्हणाले.

नाशिक महापालिकेच्या सातही विभागांमध्ये जिजामाता प्रसूतिगृह, सय्यदानी मॉजीसाहेबा मुलतानपुरा प्रसूतिगृह, मायको प्रसूतिगृह, स्वामी समर्थ रुग्णालयासह १२ प्रसूतिगृहे महापालिका हद्दीत आहेत. या ठिकाणी १३ प्रसूतितज्ज्ञ कार्यरत आहेत. परंतु, शस्त्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रसामग्री या ठिकाणी नाही. महापालिकेकडून रिक्त पदांची कारणे देत गुंतागुंतीची आणि शस्त्रक्रिया आवश्यक असलेली प्रकरणे जिल्हा रुग्णालयात वर्ग केली जात आहेत. याचा ताण जिल्हा रुग्णालयावर येतो.

लवकरच ‘माता-बाल रुग्णालय’ हा स्वतंत्र विभाग सुरू झाल्यास प्रसूतीशी संबंधित सेवासुविधा अधिक चांगल्या स्वरूपात देण्यात येतील, असा विश्वास डॉ. सैंदाणे यांनी व्यक्त केला.

अनेक पदे रिक्त

नाशिक महापालिका हद्दीतील सात वेगवेगळ्या विभागांमध्ये वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा अन्य अशी स्वतंत्र पदे नाहीत. यातील १३ वैद्यकीय अधिकारी हे प्रसूतीचे काम पाहतात. बिटको रुग्णालयात शस्त्रक्रियेची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी महिन्यात ७० पेक्षा अधिक शस्त्रक्रिया होतात. तर २७० नैसर्गिक प्रसूती, अशी आकडेवारी आहे. मागील आठवडय़ापासून वैद्यकीय अधिकारी रजेवर आहेत. दुसरीकडे, काही वैद्यकीय अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने रिक्त पदांची समस्या आहेच. शासन अध्यादेश काढत नसल्याने रिक्त पदे भरता येत नाहीत. तसेच यंत्रसामग्रीचा अभाव आहे. याचा ताण आरोग्य विभागावर येत असल्याने ही सेवा काही दिवसांपासून विस्कळीत झाली आहे.

– डॉ. नितीन रावते (नाशिक महापालिका, वैद्यकीय अधिकारी)