30 May 2020

News Flash

गरजूंचा अन्न सुरक्षा योजनेत समावेशासाठी महाराष्ट्राचा कोटा वाढवा

अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची मागणी

संग्रहित छायाचित्र

देशासह राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर, गरीब, गरजू नागरिकांना मोफत, स्वस्त अन्न धान्य दिले जात आहे. सध्याची परिस्थिती आणि निर्माण होणारी बेरोजगारी पाहता येणाऱ्या काळात ही मागणी अधिक वाढणार आहे. शिधापत्रिका नसलेल्या गरीब आणि गरजू नागरिकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्राला १० टक्के कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली.

शुक्रवारी केंद्रीय अन्न नागरी नागरी पुरवठामंत्री राम विलास पासवान यांनी देशातील सर्व राज्यांमधील अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांशी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधला. महाराष्ट्र राज्याच्यावतीने भुजबळ यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातून सहभाग घेतला.

महाराष्ट्रातील ज्या नागरिकांकडे रेशनकार्ड आहे, पण ते अन्न सुरक्षा योजनेत बसत नाहीत, अशा तीन कोटी लोकांना राज्य शासनाने स्व खर्चाने २१ आणि २२ रुपये दराने धान्य घेऊन त्याचे वितरण केले. शिधापत्रिका नसलेल्या गरीब, गरजुंना अन्न सुरक्षा योजनेची नितांत गरज आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर, त्यांच्याबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत शिधापत्रिका नसलेल्या लाभार्थ्यांना मे आणि जून या दोन महिन्याच्या कालावधीत प्रतिमाह प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ वाटपाचे नियोजन पूर्ण झाले आहे. २५ मे पासून राज्यात शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना तांदळाचे वितरण सुरु करण्यात येईल. या योजनेत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना एक किलो तूरडाळ किंवा चनाडाळ देण्यात यावी. तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील डाळ महाराष्ट्रामध्ये विलंबाने पोहचत आहे. त्यामुळे डाळीची वाहतूक राज्यात सुरळीत, वेळेत होण्याची मागणी भुजबळ यांनी केली.

अन्न सुरक्षा कायद्यातील लाभार्थ्यांना वितरीत करून झाल्यानंतर जे पाच ते १० टक्के अन्नधान्य वाचते आहे, त्याचे वितरण गरजूंना व्हावे यासाठी १० टक्के शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समावेश करण्यासाठी परवानगी द्यावी. डिजिटल वितरण प्रणालीच्या अद्ययावतीकरणासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक प्रणालीद्वारे अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी त्यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवून अधिक सक्षमतेने काम करता येईल, याकडे लक्ष वेधण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 12:10 am

Web Title: increase maharashtras quota for inclusion of needy in food security scheme abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘ट्विटर आंदोलन’ची तहान अखेर पत्रांवर!
2 ग्लेनमार्कतर्फे ‘फेव्हिपीरावीर’च्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या
3 पाच राज्यांकडून असहकार्य
Just Now!
X