नाशिक, मालेगावसह अन्य ठिकाणी भाजपतर्फे वीज देयकांची होळी

नाशिक : राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे टाळेबंदीतील वीज देयकांमध्ये सवलत द्यावी, या मागणीसाठी भाजपच्या वतीने सोमवारी नाशिक, मालेगाव शहरासह ठिकठिकाणी वीज देयकांची होळी  करण्यात आली.   अंदाजे सरासरी देयके देऊन राज्य सरकारने महावीज घोटाळा केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. वीज देयकांचा मुद्दा दोन, तीन महिन्यांपासून गाजत असून भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडीची कोंडी करण्याची धडपड चालवली आहे.

टाळेबंदीच्या काळातील अवास्तव वीज देयकांवरून ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरवाढीस विरोध असतानाही ती १ एप्रिल २०२० पासून लागू करण्यात आली. देशात टाळेबंदी जाहीर झाली. व्यापार-उद्योगांसह सर्वच बंद झाल्याने आर्थिक चक्र थांबले. उत्पन्नाचे काही साधन उपलब्ध नव्हते. अशा परिस्थितीत महावितरणने ग्राहकांना अंदाजे अवास्तव देयके दिली. त्या संदर्भात ओरड झाल्यावर देयकांमध्ये सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. परंतु आता खुद्द ऊर्जामंत्र्यांनीच देयकांमध्ये दिलासा देता येणार नसल्याचे आणि नागरिकांना देयके  भरावी लागतील असे स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर, भाजपने ठिकठिकाणी आंदोलन करत वाढीव वीज देयकांची होळी केली. रविवार कारंजा येथे भाजपच्या आमदार देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, देवदत्त जोशी यांच्या उपस्थितीत तर सिडको, सातपूर येथे आमदार सीमा हिरे, जगन्नाथ पाटील, अविनाश पाटील आदींच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. मुळात टाळेबंदीच्या काळात राज्य सरकारने सामान्यांना मदत करणे अपेक्षित होते. मदत करणे दूर, उलट महावितरणने अवाच्या सवा देयके देऊन ग्राहकांना धक्का दिल्याची तक्रार करण्यात आली. राज्यात अडीच कोटी वीज ग्राहक आहेत. आठ महिन्यांच्या काळात एका ग्राहकाला सरासरी पाच हजार रुपये वाढीव देयक गृहीत धरले तरी वाढीव देयकांचा आकडा कोट्यवधींच्या घरात जातो. संकटकाळात राज्य सरकार जनतेच्या पैशावर दरोडा टाकत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. राज्य सरकार, महावितरण कंपनीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी घोषणा दिल्या.

मालेगाव, दिंडोरीसह इतरत्रही देयकांची होळी, रास्ता रोको

राज्य शासनाने आधी जाहीर केल्याप्रमाणे टाळेबंदीकाळातील वीज देयकांमध्ये सवलत द्यावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम आणि जिल्हा प्रभारी शशिकांत वाणी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मालेगाव येथेही वीज देयकांची होळी करण्यात आली. दिंडोरी, सटाणा, पिंपळगाव बसवंतसह ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी वीज देयकांची होळी केली. महाविकास आघाडी सरकारकडून जनतेचा विश्वासघात झाल्याचे दिसून येत असल्याची टीका वाणी यांनी केली. आघाडी सरकारने अन्य राज्यांप्रमाणे हातावर पोट भरणारे श्रमिक, रस्त्यावरील व्यावसायिक, बारा बलुतेदार, शेतकरी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक अशा गरजू घटकांना सवलत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. सरकारचा निषेध असो, वीज सवलत मिळालीच पाहिजे अशा घोषणा देत पक्ष कार्यकत्र्यांनी मालेगाव येथील वीज कंपनीच्या कार्यालयासमोर देयकांची होळी केली. या वेळी नंदूतात्या सोयगावकर, हरिप्रसाद गुप्ता, भरत पोफळे, पोपट लोंढे, यू. आर. पाटील आदी उपस्थित होते. आमदार दिलीप बोरसे यांच्या नेतृत्वाखाली नामपूर येथील चार फाट्यावर देयकांची होळी करून ताहाराबाद-मालेगाव रस्ता रोखून धरण्यात आला.