डॉ. विजय भटकर यांचा विश्वास

छत्रपती शिवाजी महाराज सर्वच क्षेत्रांत निष्णात होते. जगभरात अनेक राजे झाले, पण शिवाजी महाराज सर्व राजांचे राजे होते. ते एक ‘एक्सलन्स’ म्हणजे सर्वोत्कृष्ट राजे होते. त्यामुळे आजचा दिवस फारच पवित्र आहे, असे सांगत भारत पुन्हा एकदा जगाचा गुरू बनेल, असा विश्वास परम संगणकाचे जनक, नालंदा विद्यापीठाचे कुलपती आणि वैज्ञानिक डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केला.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या १०१ व्या वर्षपूर्तीनिमित्त मंगळवारी सकाळी आयोजित सोहळ्यात भटकर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेतर्फे डॉ. भटकर यांना ‘सर डॉ. एम. एस. गोसावी एक्सलन्स’ तर प्रकाश पाठक यांना ‘गोखले एज्युकेशन सोसायटी ऑननरी फेलोशिप’ने सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी, तर प्रमुख पाहुणे म्हणून डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रभात रंजन, संदीप विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रामचंद्रन उपस्थित होते.

शिवजयंतीच्या दिवशी आयोजित सोहळ्यात भटकर यांनी शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा उल्लेख केला. डॉ. प्रकाश पाठक यांनी शिक्षण क्षेत्रात काम करण्याची जबाबदारी या शिष्यवृत्तीने वाढविली असल्याची भावना व्यक्त केली. शिक्षण क्षेत्रात प्रामाणिक प्रयत्न केल्यास भारत परमगुरू बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रामचंद्रन यांनी गोखले सोसायटीचे पायाभूत बौद्धिक मजबूत असल्याचे नमूद केले. सर्व शिक्षकांनी ते अधिक मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यायला हवेत. आपल्या मार्गातील अडथळे काढून टाकले तर आपण विकासाला वेग देऊ  शकू, असा आशावाद व्यक्त केला. डॉ. रंजन यांनी डॉ. ए.पी.जे. कलाम यांचा विकासविषयक दृष्टिकोन मांडला. आम्ही भारताच्या विकासऐवजी भारतीयांचा विकास यावर लक्ष केंद्रित केले. ढोबळ देशी उत्पादनाचा आकडा दहापटीने वाढला तरी सामान्यांच्या जीवनात फार फरक पडत नाही. तंत्रज्ञानाने देशाचा विकास होऊ  शकतो, याकडे लक्ष वेधले.

तंत्रज्ञानाचा पाठपुरावा केला नाही तर आपण मागे राहू, असे त्यांनी सूचित केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. गोसावी यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेता आले पाहिजे, हाच आमचा उद्देश असल्याचे सांगितले. तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन, डिजिटल आणि इंटरनेट या क्षेत्राचे ज्ञानही विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे.

भारतात महासंगणक कसा निर्माण केला, हे सांगताना आपला देश कोणत्याही क्षेत्रात मागे नसल्याचे जगाला दाखवून दिले. आपण कोणावरही अवलंबून नाही, आणि असता कामा नये, असे उद्योजकीय शिक्षण देण्याचे काम संस्थेने केल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. गोसावी यांच्या हस्ते पुरस्कार्थीना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात संस्थेच्या स्मरणिकेसह रिसोनन्स, स्पेक्ट्रम, स्वयंप्रकाश, स्वयंप्रेरणा या नियतकालिकांचे प्रकाशन हस्ते करण्यात आले.