विविध क्षमतेच्या तोफांमधून चाललेला भडिमार.. रॉकेल लाँचरमधून अचूक लक्ष्यभेद करणारी रॉकेट्स.. तोफगोळे व रॉकेट्सच्या अव्याहत माऱ्याने उजळलेला फायरिंग रेंजचा परिसर.. या माऱ्यावर लक्ष ठेवणारी वैमानिकरहित विमाने.. चिता व चेतक हेलिकॉप्टर्समधून झेपावलेल्या पॅराट्रुपर्सच्या अवकाशातील कसरती.. आणि युद्धभूमीवर या सर्वाचे नियोजन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या ‘साटा’ अर्थात टेहेळणी व लक्ष्यनिश्चिती विभागाची अत्याधुनिक उपकरणे.. भारतीय तोफखाना दलाच्या प्रहारक क्षमतेची अनुभूती भूतान, नेपाळ व श्रीलंका लष्कराच्या शिष्टमंडळाने घेतली. त्यास निमित्त ठरले, तोफखाना स्कूलच्या वतीने सोमवारी आयोजित ‘सर्वत्र प्रहार’ या खास प्रात्यक्षिकांचे! भारतीय तोफखाना दलाच्या या शक्ती सामर्थ्यांने ही शिष्टमंडळे चांगलीच प्रभावित झाली.

वेलिंग्टनच्या ‘डिफेन्स सव्‍‌र्हिस स्टाफ’ महाविद्यालय आणि पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षणार्थी अधिकारी, चिलखती दलातील तांत्रिक अधिकारी यांच्यासह भूतान, नेपाळ व श्रीलंकेच्या लष्करी शिष्टमंडळाच्या उपस्थितीत हा सोहळा दिमाखात पार पडला. याप्रसंगी लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल सुब्रतो साहा, तोफखाना दलाचे लेफ्टनंट जनरल पी. के. श्रीवास्तव यांच्यासह स्कूलचे कमांडंट मेजर जनरल जे. एस. बेदी उपस्थित होते. स्कूलच्या वतीने दरवर्षी या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येते. देवळाली कॅम्पलगतच्या फायरिंग रेंजवर सलग दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात तोफखाना दलाची मुख्य भिस्त सांभाळणारी १५५ एम. एम. बोफोर्स, १२० एम. एम. मॉर्टर, १०५ एम. एम. इंडियन फिल्ड गन आणि १०५ एम. एम. लाइट फिल्ड गन या तोफा सहभागी झाल्या होत्या. तसेच एकाच वेळी ४० रॉकेट डागण्याची क्षमता असणारे १२२ एम. एम. मल्टी बॅरल रॉकेट लाँचर अन् चिता आणि चेतक हेलिकॉप्टर्सच्या कामगिरीचे दर्शन घडविण्यात आले. तोफखाना स्कूलच्या गौरवशाली परंपरेला साजेशा पद्धतीने सकाळी प्रमुख मान्यवरांचे आगमन झाल्यावर मल्टी बॅरल रॉकेट लाँचरमधून रॉकेट डागून दिमाखदार पद्धतीने सलामी देण्यात आली. नेपाळ, भूतान व श्रीलंकेच्या लष्करी शिष्टमंडळांना तोफखाना दलाच्या प्रहारक क्षमतेने भुरळ पाडली.

भारतीय तोफखाना दलाकडे असणाऱ्या वेगवेगळ्या आयुधांची ओळख व क्षमता यानिमित्ताने अधोरेखित केली जाते. प्रात्यक्षिकात विविध क्षमतेच्या तोफा व रॉकेट लाँचर सहभागी झाले असले तरी अलीकडेच समाविष्ट झालेल्या ‘स्मर्च’ रॉकेट लाँचर्सचे केवळ सादरीकरण करण्यात आले. त्यांचे प्रात्यक्षिक दाखविणे या फायरिंग रेंजवर शक्य नव्हते. त्यांची मारा करण्याची क्षमता ९० किलोमीटर असून कमी अंतराच्या रेंजवर प्रात्यक्षिके सादर करणे अवघड असल्याचे कारण होते. २९० किलोमीटरवर मारा करण्याची क्षमता असणारे सुपरसोनिक ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रही तोफखाना दलाकडे असून त्याची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी, हेलिकॉप्टर व खेचरावरून मैदानात आणलेल्या तोफांच्या सुटय़ा भागांची जवानांनी काही मिनिटांत बांधणी केली. त्यानंतर सुरू झाला तो खऱ्या अर्थाने भडिमार! बोफोर्स ही तोफखाना दलाची प्रहारक तोफ. मैदानावरील विविध क्षमतांच्या तोफांमध्ये तिने आपला तो बाज अधोरेखित केला. कारगिल युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या या तोफेची प्रहारक क्षमता पुन्हा एकदा पाहावयास मिळाली. एका मिनिटात आठ ते दहा स्मोक किंवा हाय एक्स्प्लोझिव्ह बॉम्बचा मारा करू शकणाऱ्या १२० एम. एम. मॉर्टर गनने आपली क्षमता सिद्ध केल्यानंतर १०५ एम. एम. इंडियन फिल्ड गन, लाइट फिल्ड गन यांनी भडिमाराचे कसब दाखविले. प्रत्येकीच्या क्षमतेनुसार डागलेले गोळे अवघ्या २० ते ४५ सेकंदांत लक्ष्यावर जाऊन आदळले. त्यानंतर रॉकेट लाँचरने एकापाठोपाठ एक केलेल्या फायरिंगने सर्वाना आश्चर्यचकित केले.

तोफगोळ्यांच्या माऱ्याने फायरिंग रेंज परिसर अक्षरश: उजळून निघाला. याच वेळी बिनतारी यंत्रणेद्वारे विशिष्ट संदेश देण्यात आला. त्यामुळे सावध झालेले तोफांवरील जवान अवघ्या तीन ते पाच मिनिटांत सज्ज झाले. पाचव्या मिनिटाला विविध तोफांनी लक्ष्यावर जोरदार मारा केला. तोफखाना दलाच्या भाषेत त्यास ‘अग्नी वर्षांव’ असे म्हटले जाते. यामुळे फायरिंग रेंजचा डोंगर परिसर धुराने वेढला गेला होता. या प्रात्यक्षिकाद्वारे तोफखाना दल अतिशय अल्प काळात कशा पद्धतीने कार्यान्वित होऊ शकते याची माहिती दिली गेली.

विशेष म्हणजे, फायरिंगची वेगवेगळी क्षमता असणाऱ्या तोफा एकाच वेळी लक्ष्यावर अचूक मारा करू शकतात हे दर्शविण्यात आले.

दुसरीकडे डागलेल्या तोफगोळ्यांवर जमिनीवरून दिसू न शकणारी वैमानिकरहित विमाने लक्ष ठेवून होती. अचूक लक्ष्यभेद झाल्याची माहिती लगेच त्यांच्याकडून छायाचित्रांद्वारे उपलब्ध करून दिली गेली. फायरिंग रेंजच्या परिसरात चिता हेलिकॉप्टरने अगदी जमिनीजवळून उडण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर हेलिकॉप्टरमधून पाच ते सहा हजार फूट उंचीवरून पॅराट्रुपर्सने उडी मारून हवेतील कसरती सादर केल्या.

‘मेक इन इंडिया’चा प्रभाव

लष्करी सामग्रीसाठी भारत सरकारने आता ‘मेक इन इंडिया’वर लक्ष केंद्रित केले. संरक्षण मंत्रालयाने स्थानिक उद्योगांमागे उभे राहण्यासाठी लष्करी सामग्री खरेदीत बदल करत नवीन धोरण जाहीर केले. यामुळे स्थानिक पातळीवर संशोधन व उत्पादनास अधिक चालना मिळण्यास पोषक वातावरण तयार झाले. शिवाय, परदेशी उद्योगांना या बाजारातील संधी साधण्यासाठी स्थानिकांच्या सहकार्याने देशातच लष्करी सामग्री उत्पादनाचा विचार करणे क्रमप्राप्त ठरले. यानिमित्ताने, युद्धसामग्रीसाठी परदेशावरील अवलंबित्व कमी करून देशांतर्गत उत्पादनाच्या दिशेने आश्वासक पाऊल पडले आहे. या धोरणाचे प्रतिबिंब या कार्यक्रमावर पडल्याचे पाहावयास मिळाले. तोफखाना दलाच्या भात्यात समाविष्ट होणाऱ्या बहुतांश अत्याधुनिक आयुधांची निर्मिती देशात केली जात आहे. त्या अनुषंगाने माहिती या वेळी सादर करण्यात आली. तोफखाना दलाच्या टेहेळणी व लक्ष्यनिश्चिती विभाग अर्थात सव्‍‌र्हिलन्स व टारगेट अ‍ॅक्विझिशन विंग (साटा) कडून वापरल्या जाणाऱ्या लोरोज, एएनटीपीक्यू यांसारख्या टेहेळणी यंत्रणाही प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.