लोकभावनेचा विचार
शहरासाठी पालखेड धरणात आरक्षित असलेल्या पाणीसाठय़ापैकी दोन आवर्तने बाकी आहेत. त्यातील एक आवर्तन १० जानेवारीपर्यंत देण्याचे नियोजन होते. परंतु सध्या शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे लोकभावना लक्षात घेऊन पाण्याचे आवर्तन १० ते १५ दिवस अगोदर देण्याबाबत सर्व संबंधितांशी चर्चा करून फेरविचार केला जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी आयोजित पाणीटंचाई व आढावा बैठकीत ते बोलत होते.
शहराला नेहमी पाणीटंचाई जाणवते, याबाबत कायमस्वरूपी कोणते पर्याय आहेत, याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत घेतला. तूर्तास शहराला नियमित वेळेपेक्षा अगोदर पाण्याचे आवर्तन देणे तसेच नांदुर मध्यमेश्वर पाणीपुरवठा योजना दरसवाडी योजना व ओझरखेड या तीन योजनांचा आराखडा तात्काळ सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. शिवाय राहूड धरणातून वाहणारे पाणी उसवाड मार्गे वाघदर्डी धरणात घेणे या योजनेवरही चर्चा झाली. मनमाडसाठी पालखेडची दोन आवर्तने शिल्लक आहे. त्यातील एक आर्वतन जानेवारी महिन्यात तर दुसरे आवर्तन मार्च महिन्यात देण्याचे नियोजन आहे. मध्यंतरीच्या काळात पाणीटंचाई उग्र झाल्यास टँकरने पाणीपुरवठा करता येईल, मात्र पाण्याची टंचाई लक्षात घेता आवर्तन वाढवता येणे शक्य नाही. त्यामुळे आहे त्या स्थितीत पाणीपुरवठा करणे आणि पाणी जपून वापरणे आवश्यक असल्याचे कुशवाह यांनी सांगितले.
मनमाड शहरातील तीव्र पाणीटंचाई व शासकीय योजनांसह नगरपालिकेच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी सकाळी मनमाडला दाखल झाले. या वेळी नगराध्यक्ष मैमुन्न तांबोळी, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, प्रांताधिकारी वासंती माळी आदी उपस्थित होते. शहराच्या सद्य:स्थितीची माहिती देण्यात आली.
गणेश धात्रक यांनी पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. सप्टेंबरअखेरीस शहराला पाण्याचे आवर्तन मिळाले. ते पाणी १५ ते २० दिवसाआड पाणीपुरवठा या नियोजनानुसार जवळपास तीन महिने पुरविण्यात आले. मात्र आता अवघे चार ते पाच दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असल्याने आवर्तनाची मागणी प्राधान्याने मांडण्यात आली. याशिवाय शहराला रोज पाणीपुरवठा कसा करता येईल या दृष्टीने चर्चा करण्यात आली. नैसर्गिक उताराने शहराला पाणी मिळावे त्यासाठी कोणत्या योजना आहेत, याची माहिती अशोक परदेशी यांनी दिली. मांजरपाडय़ाची क्षमता कमी असल्यामुळे त्याऐवजी नांदुरमध्यमेश्वर येथून जलवाहिनी किंवा चरीव्दारे पाटोदा तलावात पाणी येऊ शकते का, राहूड बंधारा ते उसवाडमार्गे वाघदर्डी धरण या योजनेवरही चर्चा झाली. मनमाडकरांना १२ महिने रोज पाणी मिळावे असा आपला प्रयत्न आहे. या विविध प्रस्तावित योजनाचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तसेच वाघदर्डी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अवैध उपसा तात्काळ बंद करावा असेही आदेश दिले. आवर्तनाशिवाय टंचाई काळात टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन झाल्यास सर्वाना पाणी मिळेल अशा प्रकारचे उपाय करण्याची सूचनाही करण्यात आली आहे.