वाहतुकीला अडथळा ठरणारी तसेच बेशिस्त पद्धतीने कुठेही उभी केली जाणारी चारचाकी वाहने उचलण्याची कारवाई शहर वाहतूक पोलिसांनी टोईंग वाहनाच्या मदतीने सुरू केली आहे. दुचाकी वाहनांसाठी २०० रुपये दंड आकारणारे वाहतूक पोलीस चारचाकीसाठी केवळ २५० रुपये दंड आकारणार आहेत. चारचाकी वाहने उचलण्याची व्यवस्था नसल्याने वाहतूक पोलीस केवळ दुचाकी वाहनांवर कारवाई करत असल्याची वाहनधारकांची भावना होती. आता टोईंग वाहनाच्या उपलब्धतेमुळे अस्ताव्यस्तपणे वाहन उभे करणाऱ्यांना चाप बसणार आहे. या निमित्ताने मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी फुटण्यास हातभार लागण्याची शक्यता आहे.

चारचाकी वाहने उचलून नेण्यासाठी सोमवारपासून टोईंग वाहनाचा वापर सुरू झाला. जिथे गरज पडेल, त्या ठिकाणी ही कारवाई केली जाणार आहे. रस्त्यात उभी केली जाणारी चारचाकी वाहने उचलून नेण्यासाठी सध्या एकच टोईंग वाहन उपलब्ध आहे. शहर वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतूक पोलीस हेल्मेट सक्ती, भरधाव वाहनधारक, बेशिस्त रिक्षाचालक आदी मोहिमा राबवत आहे. शहरात वाहनतळाची उपलब्धता अतिशय कमी आहे. परिणामी, वाहनधारक रस्त्यावर वाहने उभी करतात. ही बाब अनेक मार्गावरील वाहतूक कोंडीला निमंत्रण देणारी ठरते. व्यापारी संकुलांबाहेर रस्त्यावर नियमबाह्यपणे उभ्या केल्या जाणाऱ्या दुचाकी उचलून नेण्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. संबंधित वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. वाहने उचलण्याच्या या प्रक्रियेत वाहनांचे नुकसान होते. दुचाकी वाहने उचलताना रस्त्यावर त्याचवेळी उभ्या असणाऱ्या चारचाकी वाहनधारकांवर कारवाई होत नसल्याची अनेकांची तक्रार होती. पोलीस यंत्रणा चारचाकी वाहनधारकांवर अधूनमधून कारवाई करत असे. परंतु, दुचाकीच्या तुलनेत चारचाकी वाहनांवर होणाऱ्या कारवाईचे प्रमाण अतिशय अल्प आहे.

या पाश्र्वभूमीवर, नव्या वर्षांत पोलिसांनी एक टोईंग वाहन आणले असून त्याच्या सहाय्याने वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने उचलण्यात येणार आहेत. यासाठी २५० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. यामुळे शहराच्या मध्यवर्ती रस्त्यांसह इतर ठिकाणी बेशिस्तपणे वाहने लावणाऱ्यांना चाप बसणार आहे.  या संदर्भात वाहतूक पोलीस विभागाचे प्रमुख जयंत बजबळ यांनी ठेकेदाराकडून सध्या एक टोईंग वाहन आणण्यात आल्याचे सांगितले. यामुळे वाहन सुरक्षित पद्धतीने उचलता येईल.  शहरात महात्मा गांधी रोडसह अन्य ठिकाणी जेथे वाहनांची गर्दी होते, त्या परिसरात मोहीम राबविण्यात येईल असे बदबळ यांनी नमूद केले.