नाशिक शहर काँग्रेससह त्यांच्या संलग्न आघाडय़ांतर्फे शुक्रवारी सकाळी आयनॉक्स चित्रपटगृहाबाहेर मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ चित्रपटाविरोधात निदर्शने करण्यात आली. त्यामुळे या चित्रपटाचा शो थांबविला गेला. मात्र, शहरातील अन्य मल्टिप्लेक्स व चित्रपटगृहात मात्र त्याचे सर्व शो सुरळीत पार पडले. या चित्रपटाद्वारे इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

‘इंदू सरकार’ हा चित्रपट तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीतील आणीबाणीतील काही काल्पनिक प्रसंगावर आधारित असल्याचा काँग्रेसचा आक्षेप आहे. या मुद्यावरून चित्रपटाच्या प्रदर्शनास काँग्रेस काही दिवसांपासून विरोध दर्शवत आहे. शुक्रवारी शहरातील मल्टिप्लेक्स व चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यास काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन करीत विरोध केला.

शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री शोभा बच्छाव, हेमलता पाटील आदींच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी चित्रपटाचे फलक फाडले. भांडारकर व चित्रपटाविरोधात घोषणाबाजी करत प्रदर्शन थांबविण्याची मागणी केली. या चित्रपटास भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निधी दिल्याचा आरोप आंदोलकांनी केला. इंदिरा गांधी यांनी देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. लोकशाही अखंडित राहावी याकरिता नाइलाजाने आणीबाणी घोषित केली. मात्र इंदू सरकारच्या माध्यमातून इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत आहे. काँग्रेससह नागरिक हे सहन करणार नसल्याचा इशारा आहेर यांनी दिला.

काँग्रेसच्या आंदोलनामुळे या चित्रपटगृहात शो थांबविण्यात आले. पोलिसांनी धाव घेऊन आंदोलकांना ताब्यात घेतले.

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या चित्रपटगृहात उपरोक्त चित्रपटाचे सर्व शो बंद करण्याची मागणी केली. एका चित्रपटगृहात एका दिवसापुरते प्रदर्शन थांबविले गेले असले तरी उर्वरित सर्व चित्रपटगृहात ‘इंदू सरकार’चे  शो सुरळीत पार पडले.