16 October 2019

News Flash

औद्योगिक सुरक्षा दलातील जवानांच्या वाहनांची जाळपोळ

भारत प्रतिभृती तथा चलार्थ मुद्रणालयाची नाशिक-पुणे रस्त्यालगत नेहरूनगर निवासी वसाहत आहे.

जाळपोळीत वाहनांचे झालेले नुकसान.

नेहरूनगरमधील घटना

नाशिक : भारत प्रतिभृती मुद्रणालय आणि चलार्थ मुद्रणालयाच्या सुरक्षा व्यवस्थेची धुरा सांभाळणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांच्या १० वाहनांची जाळपोळ झाल्याची धक्कादायक घटना नेहरूनगर परिसरात घडली. त्यात दलाच्या चारचाकी वाहनांचा समावेश असून काही महिन्यांपूर्वी याच भागात जीपची जाळपोळ झाली होती. त्या घटनेचा तपास अद्याप लागला नसताना हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

भारत प्रतिभृती तथा चलार्थ मुद्रणालयाची नाशिक-पुणे रस्त्यालगत नेहरूनगर निवासी वसाहत आहे. नाशिकरोड येथील मुद्रणालयाच्या सुरक्षेची जबाबदारी काही वर्षांपूर्वी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे सोपविण्यात आली. या दलाचे अधिकारी आणि जवानांना मुद्रणालयाची निवासस्थाने उपलब्ध करण्यात आली आहेत. त्याच ठिकाणी बुधवारी पहाटे साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान, वाहने जाळपोळीची घटना घडली.

इमारतीच्या वाहनतळात उभ्या असणाऱ्या अनेक दुचाकी कोणीतरी पेटवून दिल्या. त्यात दलाच्या सरकारी चारचाकी गाडीचाही समावेश आहे. दुचाकी पेटल्याचे लक्षात आल्यावर एकच धावपळ उडाली. जवानांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, तोपर्यंत वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.

या संदर्भात ‘सीआयएसएफ’चे हवालदार संजयकुमार बनसोडे यांनी तक्रार दिली. त्यावरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपरोक्त घटना पूर्ववैमनस्यातून घडली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दोन महिन्यांपूर्वी याच परिसरात दोन जीप पेटविल्या गेल्या होत्या. त्या प्रकरणाचा उलगडा झाला नसताना वाहनांची जाळपोळ झाली. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल स्थानिक पोलीस यंत्रणेला फारशी दाद देत नसल्याचे सांगितले जाते.

सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

काही वर्षांपूर्वी शहरातील इतर भागात दुचाकी जाळपोळींच्या अनेक घटना घडल्या. परंतु, नागरी भागातील त्या घटना आणि औद्योगिक सुरक्षा दलाच्या निवासी इमारतीतील घटना यात फरक आहे. नेहरूनगर शासकीय वसाहतीत दलाचे १०० ते १५० जवान वास्तव्यास आहेत. परिसरातील इमारती एकसारख्या असून तिथे बाहेरील व्यक्तीला प्रवेश नाही. मुद्रणालयातील कर्मचारी काही ठिकाणी वास्तव्यास आहेत. या घटनेमुळे परिसराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

First Published on January 3, 2019 12:33 am

Web Title: industrial security force jawan vehicles sets on fire