रुग्णवाहिकेअभावी बाळासह मातेचा पावसात दुचाकीवरून प्रवास

नाशिक : आरोग्य सुविधेचा अभाव आणि उपचार न झाल्यामुळे बागलाण तालुक्यातील वनोली येथे पाच दिवसांच्या तान्ह्य़ा बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

बागलाणच्या वनोली येथील मंदा पिंपळसे यांनी बाळाला जन्म दिल्यानंतर ते स्तनपान करत नसल्याने कुटुंबीयांनी ३० जुलै रोजी सकाळी ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी धाव घेतली. दोन ते तीन तास थांबूनही आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी न आल्याने परिचारिकेने रुग्णाचे संदर्भसेवा पत्र भरून पालकांच्या हाती दिले. पुढील उपचारासाठी पिंपळसे कुटुंबीयांनी सटाणा ग्रामीण रुग्णालयात जाण्याचे ठरविले. त्यासाठी शासनाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून मोफत सेवा देणे नियमाने बंधनकारक होते. परंतु रुग्णवाहिकेची सेवा न मिळाल्याने आई आणि बाळाला भर पावसात दुचाकीवरून रुग्णालयापर्यंत पोहोचवावे लागल्याचे उघड झाले आहे. तिथे रुग्णालयात दाखल करूनही उपचार न झाल्याने बाळाचा मृत्यू झाला.  भर पावसात मातेसह बाळाला सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. या वेळी तेथे नेमणुकीवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळाची तपासणी न करता पोटाला हात लावून एक औषध लिहून देत घरी पाठवले. घरी नेल्यानंतर बाळाची प्रकृती अधिकच बिघडली. उपचारासाठी नातेवाईकांनी पुन्हा भर पावसात दुचाकीवर ग्रामीण रुग्णालयात आणले. या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळाला मृत घोषित केले. उपचाराअभावी बाळ दगावल्याने संतप्त नातेवाईकांनी एकच गोंधळ घालून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार न केल्यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप  केला. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाळाची तपासणी करून मृत घोषित केले असतानाही ग्रामीण रुग्णालयाच्या दप्तरी मृत्यूची नोंदच नाही. यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली. शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.