प्रशासनाकडून विविध उपाययोजना, आठ दिवस घोटी बंद

इगतपुरी : नाशिक जिल्ह्य़ात बहुतांश ठिकाणी करोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इगतपुरी तालुक्यात करोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. घोटी ही तालुक्याची व्यापारीपेठ असल्याने घोटीत विशेष खबरदारी घेण्यात येत होती. परंतु, इतके करूनही अखेर घोटीत करोनाने शिरकाव केला असून एका रुग्णाचा अहवाल सकारात्मक आला आहे. रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे.

तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथेही मुंबईहून पाहुणे येत असल्याने बेलगाव कुऱ्हेसह गोंदेदुमाला, वाडीवऱ्हे ही गावे बंद ठेवण्यात आली आहेत. घोटी शहरात करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याचे समजताच प्रशासन, ग्रामपालिका यंत्रणा खडबडून जागी झाली असून सोमवारी सकाळी शहरात भरलेला बाजार तत्काळ बंद करण्यात

आला. पुढील आठ दिवस एक जूनपर्यंत घोटी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाच्या आवाहनानंतर व्यापारी आणि भाजी विक्रेत्यांनी आपआपली दुकाने बंद केली.

ग्रामपालिकेने परिसरात फवारणी केली. प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे, तालुका वैद्यकीय अधिकारी देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, प्रभारी सरपंच संजय आरोटे, ग्रामपालिका सदस्य यांनी प्रतिबंधित क्षेत्रास भेट देऊन खबरदारीच्या पर्यायी उपाययोजनांची माहिती घेतली.

संपूर्ण घोटी शहरात टाळेबंदी अधिक कडक करण्यात आल्याने खरेदीसाठी सकाळीच आलेल्या अनेक ग्राहकांना रिकाम्या हाती परतावे लागले.

ग्रामीण भागातील नागरिकांनीही घोटीत ये-जा करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून घोटीत आढळून आलेला ४५ वर्षांचा रुग्ण करोनाबाधित निघाला. घोटी देवी मंदिर परिसरात राहत असलेला हा रुग्ण आरोग्य विभागात सेवेत आहे.

धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत झालेल्या सर्वेक्षण मोहिमेदरम्यान बाहेरगावाहून आलेल्या संशयित रुग्णाच्या तो संपर्कात आला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तीन दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू असून त्याचा वैद्यकीय अहवाल सकारात्मक आला आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा आरोग्य विभागाकडून शोध घेतला जात असून त्याच्या संपर्कात आलेल्यांचे विलगीकरण करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.