नाशिक : करोना विषाणुच्या प्रादुर्भावापासून संरक्षण होण्याकरिता सर्व स्तरावर प्रयत्न होत आहेत. करोनाचा सकारात्मक अहवाल आल्यास नागरिकांची धावपळ उडते. संबंधित संसर्ग झालेल्या बाधिताला कोणत्या दवाखान्यात दाखल करायचे, तिथे कोणत्या प्रकारचे रुग्ण आहेत. या सर्व बाबींची माहिती  नाशिकच्या क्रेडाईने तयार केलेल्या ‘हेल्थ प्राईम नाशिक’ या अ‍ॅपद्वारे एका क्लिकवर समजणार आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या अ‍ॅपचे लोकार्पण झाले. यावेळी दूरचित्रवाणी परिषदेत महापौर सतीश कुलकर्णी, पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, नगरसेविका समीना मेनन, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, बांधकाम व्यावसायिक जितेंद्र ठक्कर, डॉ.आवेश पलोड आदी उपस्थित होते.

या अ‍ॅपमुळे खाटांची संख्या, अतिदक्षता विभागातील खाटा, पालिकेचे आरक्षण, नॉन कोविड खाटा आणि खासगी खाटा आदींची माहिती मिळणार असून रुग्णांची स्थिती, आजारानुसार रुग्णांचे वर्गीकरण यांची देखील माहिती यात असणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

नागरिकांसाठी सर्व दवाखान्यांमध्ये एक संपर्क अधिकारी नेमण्यात यावा. जेणेकरून नागरिकांना एकाच संबंधित अधिकाऱ्यासोबत चर्चा करता येईल, तसेच रुग्णाला कुठल्या रुग्णालयात पाठवायचे आहे याबाबत मदत होईल असे भूजबळ यांनी  पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.

महापालिकेतर्फे ‘नाशिक कोविड १९’चा डॅशबोर्ड

करोनावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेतर्फे डिजिटल पध्दतीचा वापर केला जात आहे. त्या अनुषंगाने फॉक्सबेरी टेक्नॉलॉजिजच्या सहकार्याने महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबतचे विविध अहवाल एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरूवात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आली. या माध्यमातून एका क्लिकवर शहरात सद्यस्थितीत एकूण रुग्ण, विभागनिहाय रुग्ण, बरे होऊन घरी परतलेले रुग्ण, सध्या उपचार घेणारे रुग्ण, किती रुग्णांचा मृत्यू झाला याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय विभागनिहाय रुग्णसंख्या, वय, वगीकरणानुसार करोनाबाधितांची संख्या, रुग्णाचा दिनांकनिहाय आलेख, दवाखान्यांमध्ये उपलब्ध खाटांची संख्या, करोना केंद्रांची स्थिती, खासगी रुग्णालयात उपलब्ध खाटा आदी माहिती देण्यात आली आहे.