नेचर क्लब आणि पशुवैधक अधिकाऱ्यांकडून जीवदान

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्य़ाचे भरतपूर समजल्या जाणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात चापडगाव येथे जखमी अवस्थेत सापडलेल्या गिधाडावर नेचर क्लब ऑफ नाशिक आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याने पुन्हा आकाशात भरारी घेतली.

चापडगाव येथे राहणाऱ्या लता लोखंडे गवत कापत असतांना त्यांना गिधाडाचे तीन महिन्याचे पिलू आढळले. लोखंडे या त्याला घेऊन आल्या. नेचर क्लब ऑफ नाशिक आणि वन विभागाला त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. पक्षीमित्र प्रा.आनंद बोरा, उमेशकुमार नागरे हे चापडगावला पोहचल्यावर पाऊस आणि आणि हवेमुळे  पिलू जमिनीवर पडल्याचे त्यांना दिसून आले. वन विभागात नोंद करून त्याला नाशिकच्या पशु वैद्यकीय दवाखान्यात तपासणीसाठी आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय विसावे, डॉ. सचिन वेंदे, डॉ. संदीप पवार, डॉ. किरण आठरे यांनी त्याची तपासणी केली. त्याला अशक्तपणा आल्याने डॉक्टरांनी औषधे दिली. वन विभागाच्या परवानगीने त्याला पक्षीमित्र उमेश नागरे यांच्याकडे ठेवण्यात आले. आठवडय़ानंतर पिलाने खाण्यास सुरूवात केली. माणसांपासून त्याला दूरच ठेवण्यात आले होते. ते पिलू असल्याने त्याला उब देण्यात येत होती. व्यायाम करून घेण्यासाठी रोज त्याला शहराबाहेरील मोकळ्या पटांगणात मोकळे सोडले जात असे. नागरे हे त्याला उडण्यासाठी शिकवत. वनसंरक्षक भगवान ढाकरे आणि उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांच्या उपस्थितीत अंजनेरी  येथे त्याला सोडण्यासाठी नेले असता ते उडू न शकल्याने त्याला परत आणावे लागले. त्याचे खाद्य वाढविण्यात येऊन पुन्हा काही दिवसांनी वन विभागाच्या मदतीने अंजनेरी येथे त्यास सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिन्याभराच्या परिश्रमाला यश आले. पिलाने हवेत भरारी घेताच सर्वांनी एकच जल्लोष केला. त्याला सोडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पक्षीमित्र उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Injured vulture fill after treatment
First published on: 12-09-2018 at 04:32 IST