तांत्रिक अडचणींमुळे पुरतत्त्व विभागाकडून केवळ नोंद

मंदिरांचे शहर असलेल्या नाशिक नगरीत पौराणिकसह मुघल, पेशवे, ब्रिटिश यांच्याशी संबंधित इतिहासाचे अनेक संदर्भ पुरातत्त्व विभागाकडे उपलब्ध आहेत. इतिहासप्रेमी देवांग जानी यांना कपालेश्वर मंदिराच्या कलशाजवळ प्राचीन शिलालेख आढळला. काही तांत्रिक अडचणींमुळे या शिलालेखाची नोंद करण्यापलीकडे यामध्ये फारसे काही करता येणार नसल्याचे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले आहे.

‘की टू नाशिक- त्र्यंबक १९४१-४२’ या पुस्तकात येथील कपालेश्वर मंदिराच्या छतातील कलशाजवळ प्राचीन शिलालेख असल्याचा संदर्भ नमूद आहे. त्यानुसार जानी यांनी शनिवारी सहकाऱ्यांसह कलशाजवळ जाऊन तपासणी केली असता असता त्यांना  प्राचीन शिलालेख छताजवळ आढळला. पुस्तकातील उल्लेखानुसार इ.स. ११०० मध्ये स्थानिकांच्या विनंतीवरून गवळी राजाने परिसरातील जमिनी विकत घेऊन पाच हजार रुपये खर्च करून श्री कपालेश्वर मंदिर बांधून संस्थानला अर्पण केले. इ.स. १७३८ मध्ये कोळी राजा नाशिक मुक्कामी असताना कोळी राजाने मंदिरातील पूजाविधीसाठी शैव-गुरवांची नेमणूक केली.  इ.स. १७६३ मध्ये मंदिरातील पायऱ्या कृष्णाजी पाटील-पवार यांनी बांधून दिल्या. कपालेश्वर मंदिर आणि सभामंडप जीर्ण झाल्यामुळे शेठ खिमजी आसर आणि इतरांनी २० हजार रुपये खर्च करून १९०२ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदिर विश्वस्तांकडे सुपूर्द केल्याचा उल्लेख पुस्तकात आहे.

शिलालेखाचा शोध घेताना जानी आणि सहकाऱ्यांना जलरोधकचे काम करतांना शिलालेख झाकला गेल्याचे लक्षात आले. त्याची स्वच्छता करून शिलालेख मोकळा करण्याच्या प्रयत्न केला, परंतु त्यावर प्लास्टिकचे आवरण असल्यामुळे शिलालेखातील अंकित अक्षर पुसले जात आहे. त्यामुळे पुढील कारवाईसाठी पुरातत्त्व विभागाशी पत्रव्यवहाराद्वारे संपर्क साधून ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे. या संदर्भात केंद्रीय तसेच राज्य पुरातत्त्व विभागाशी पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे जानी यांनी सांगितले. नाशिक नगरीला रामकालीन, मराठाकालीन, मुघलकालीन, पेशवेकालीन आणि ब्रिटिशकालीन असा प्रदीर्घ इतिहास आहे. अशा स्वरूपाच्या अनेक पुरातन वास्तू शहरात अस्तित्वात आहेत. गरज आहे मौल्यवान ठेवा शोधून त्याचे जतन करण्याची. आगामी काळात नाशिक शहराचा ‘हेरिटेज सिटी’मध्ये समावेश होण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे जानी यांनी नमूद केले.

कपालेश्वर मंदिराचा समावेश ऐतिहासिक वास्तूत नाही. यामुळे त्यावर काम करण्यास मर्यादा येतात. शिलालेखासंदर्भात जानी यांच्याकडून पत्रव्यवहार झाल्यानंतर त्याची पाहणी करून पुरातत्त्वच्या सर्व शाखांना याबाबत माहिती देण्यात येईल. या संदर्भात कोठेही शिलालेखाची नोंद नसल्यास त्याची ‘गॅझेट’मध्ये नोंद करण्यात येईल.

– विलास वाहणे, राज्य पुरातत्त्व नाशिक विभाग प्रमुख