खासदारांसह अधिकाऱ्यांची मोहीम

इगतपुरी : शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने आणलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचतात की नाही, तसेच अनुदानातून साधनसामग्री उभारून शेती प्रगतीसाठी त्याचा कितपत उपयोग होत आहे, याची पाहणी करण्यासाठी सोमवारी खासदार हेमंत गोडसे यांनी अधिकाऱ्यांसह थेट शेतीच्या बांधावर धाव घेतली.

ठिबक सिंचन, राष्ट्रीय कृषी विकास, विमा, मृदा आरोग्य पत्रिका (माती परीक्षण), कृषी यांत्रिकी आदी केंद्र शासनाच्या योजना असून या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी विशेष अनुदान दिले जाते. या योजनांचा शेतकऱ्यांना नेमका किती आणि कसा लाभ होतो याची माहिती जाणून घेण्यासाठी खासदार गोडसे यांनी कृषी विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह नाशिक, सिन्नर, इगतपुरी या तालुक्यांमधील ग्रामीण भागाचा पाहणी दौरा केला.

सकाळी नाशिक तालुक्यातील दोनवाडे येथून पाहणी दौऱ्याला प्रारंभ झाला. दोनवाडे शिवारातील संजय सांगळे यांचे शेडनेट तसेच काशिनाथ वाघ यांच्या पॉलीहाऊसची पाहणी केली. पॉलीहाऊसमध्ये बहरलेल्या फुलांची बाग पाहण्यात आली. यावेळी खासदारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शेडनेट आणि पॉलीहाऊससाठी शासनाकडून किती अनुदान मिळाले, तसेच पिकांच्या उपयोगासाठी शेडनेटचे महत्त्व जाणून घेतले. यानंतर सोमनाथ सांगळे यांनी शासनाच्या अनुदानातून उभारलेल्या कांदा चाळीची पाहणी करीत चाळीसाठी शेतकऱ्यांना शासनाकडून पुरेसे अनुदान मिळते का, याविषयीची माहिती जाणून घेतली. दुपारी सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे विलास बोराडे यांच्या ५६ एकर द्राक्ष बागेची पाहणी करण्यात आली. द्राक्ष बागेत अनुदानातून टाकलेल्या ठिबक सिंचन योजनेची तसेच बोराडे यांनी उभारलेल्या अद्यावत तंत्राचीही माहिती जाणून घेतली. याप्रसंगी गोडसे यांच्या हस्ते पांढुर्ली शिवारात कृषी यांत्रिकी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना शासनाच्या अनुदानातील साधन सामग्रीचे वाटप करण्यात आले.

यावेळी पांढुर्ली शिवारातील अनेक शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. त्यांनतर अधिकाऱ्यांसह खासदार इगतपुरी तालुक्यातील साकूर फाटा येथे गेले. याठिकाणी ‘विकेल ते पिकेल’ या शासनाच्या धोरणातंर्गंत थेट भाजीपाला केंद्र विक्रीचे उद्?घाटन करण्यात आले. त्यानंतर त्रिगंलवाडी येथील पाणलोट विकास योजनेतून झालेल्या कामांची माहिती घेण्यात आली. या दौऱ्यात जिल्हा कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, संजय सूर्यवंशी, प्रकल्प उपसंचालक तसेच सिन्नर तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.