ज्या व्यक्तींनी आजपर्यंत आपले उत्पन्न घोषित केलेले नाही किंवा त्याचा आयकर भरलेला नाही, अशा व्यक्तींनी उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयकर विभाग आयुक्त ए. सी. शुक्ल यांनी केले आहे. उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेंतर्गत हप्त्याने रक्कम जमा करता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

या योजनेंतर्गत कोणाची कुठलीही चौकशी, आयकर वा संपत्ती कायद्यानुसार होणार नसून ही संपूर्ण माहिती गुप्त ठेवली जाणार आहे. या बाबतचा तपशील कोणत्याही संबंधित सरकारी विभागाला दिला जाणार नाही. जाहीर केलेल्या मालमत्तेचे मूल्य, खरेदीची किंमत आणि १ जून २०१६ रोजी ठरवलेले बाजार मूल्य यापैकी जे अधिक असेल ते गृहीत धरले जाईल. मात्र अचल संपत्तीचे मूल्यांकन खरेदीच्या वेळी भरलेल्या मुद्रांक शुल्काच्या आधारावर गृहीत धरण्याचा पर्याय दिला आहे. घोषित उत्पन्नावर जर स्रोतातून कापलेल्या कराचा दावा नसेल तर तो आता करता येईल. तसेच, एखाद्या सर्वेक्षणांतर्गत अथवा धाडसत्रात जर काही घोषित उत्पन्नासंबंधी पुरावा मिळाला तर त्याची चौकशी किंवा कार्यवाही होणार नाही. योजनेत सहभागी होताना मालमत्तेचे घोषणापत्र आयकर आयुक्त सी.पी.यू बंगळूरू यांच्याकडे ऑनलाइन पद्धतीने थेट भरता येणार आहे. या संदर्भातील सर्व सूचना आयकर विभागाच्या संकेतस्थळावर असून मदत वाहिनी क्रमांक २४ तास कार्यरत आहे. ही योजना केवळ ३० सप्टेंबरपुरती मर्यादित असून तिचा संबंधितांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. आपल्या शंका किंवा अडचणींबाबत जवळच्या आयकर विभाग कार्यालय व अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. या योजनेची माहिती सर्व स्तरांपर्यंत पोहोचावी यासाठी व्यापारी संघटना, सनदी लेखापाल यासह अन्य काही संबंधित विभागांशी चर्चा करण्यात आली आहे.

या योजनेला प्रतिसाद लाभत असून करदात्यास ही शेवटची संधी आहे. या योजनेमुळे १४८ची कारवाई थांबविण्यात आल्याचे शुक्ल यांनी सांगितले.