भाजपचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार 

नाशिक : प्राणवायू, रेमडेसिविरअभावी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. अपुरा पुरवठा होत असल्याने जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त हतबल आहेत. पालकमंत्री छगन भूजबळ हे स्वत: असहाय्य असल्याचे सांगतात. करोनाच्या भीषण संकटात मग नागरिकांनी कुठे दाद मागायची, असा प्रश्न करीत भाजपचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी राज्य सरकारने ठाणे, पुणे, नगर भागास वेगळा न्याय लावत नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडल्याची टीका के ली. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील स्थितीबाबत गुरूवारी मंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

बुधवारी महाजन यांनी नाशिकरोड येथील नवीन बिटको रुग्णालयास भेट दिली. जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांची भेट घेऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला. प्राणवायू, रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत देशात नाशिकमध्ये करोनाचा प्रसार जास्त आहे. पण, रुग्णांना उपचारासाठी आवश्यक त्या साधनांची कमतरता आहे. राज्य सरकारने समप्रमाणात वाटप

करायला हवे. नाशिकबाबत शासन उदासिन आहे. पंतप्रधान काळजी निधीतून पाठविलेले व्हेंटिलेटर अजूनही पूर्ण क्षमतेने वापरात नसल्याचे महाजन म्हणाले.  मृतांची संख्या वाढत असून स्मशानभूमीत प्रतिक्षा करावी लागत असून खासगी रुग्णालयातील देयकांच्या अनेक तक्रारी आहेत. देयकासाठी रुग्णाला रुग्णालयात डांबून ठेवले गेले.

नागरिकांची लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. रेमडेसिविर काळ्या बाजारात १२ ते १५ हजारात विकले जाते. काही मंडळीचे वर्तन माणुसकीशून्य असून काळा बाजार करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी महाजन यांनी केली. महापालिका नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे. पालिकेने २० हजार रेमडेसिविरची मागणी नोंदविली. त्यातील सात हजार इंजेक्शन प्राप्त झाले आहेत.

पालिका रुग्णालयात रेमडेसिविर आणि प्राणवायूचा तुटवडा नसल्याचा दावा त्यांनी केला. केंद्राकडून मदत येते. पण, राज्य सरकार नियोजनात अपयशी ठरले. निर्बंधाचा कालावधी सरकारने वाढविला. पण, तीन, चार तासाचा जो कालावधी असतो, त्यावेळी लोक प्रचंड गर्दी करतात. नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

‘बिटको’तील सिटी स्कॅन यंत्र तात्काळ सुरू करा

कोट्यवधी रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेले सिटी स्कॅन, एमआरआय आदी यंत्रणा कित्येक महिन्यांपासून बिटको रुग्णालयात धूळखात पडून आहे. करोना काळात सिटी स्कॅनची चाचणी महत्वाची असूनही रुग्णांना खासगी केंद्रात चाचणी करावी लागते. या यंत्रणा अद्याप सुरू झाल्या नसल्यावरून महाजन यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाला धारेवर धरले. मनुष्यबळ भरतीची प्रक्रिया पूर्ण होत असल्याचा बचाव वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला. तथापि, ती प्रक्रिया होईल तेव्हा होईल, तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था करून गुरूवारपासून ही यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्याची सूचना केली.

खान्देशात चाचणी अहवालास विलंब

चाचणी केल्यानंतर एकवेळ नाशिकमध्ये अहवाल लवकर मिळत असेल. पण धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यात एकदा नमुना दिला की १२ ते १४ दिवस अहवाल मिळत नाही. तोपर्यंत रुग्ण सार्वजनिक ठिकाणी फिरतो. आजाराचा प्रसार वाढतो. सरकारने हा विषय गांभिर्याने घेण्याची गरज असल्याचे महाजन यांनी नमूद केले.