नाशिकमध्ये उमेदवारीसाठी भाजपकडून पैशांची मागणी

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी तिकीट न मिळाल्याने झालेल्या हाणामाऱ्या, नाराजी, रुसवेफुगवे यामुळे राज्यातील मतदारांना सर्वपक्षीय राजकीय बेबंदशाहीचे दर्शन होत असतानाच शनिवारी, दुसऱ्या दिवशीही जागावाटप, तिकीटवाटप, पैसेवाटप, आघाडी-बिघाडी या व तत्सम असंख्य कारणांनी बेबंदशाहीचा दुसरा अंक अनुभवास आला. हे सर्व नाटय़ ताजे असतानाच नाशिक भाजपमध्ये वेगळेच नाटय़ रंगले.. उमेदवारीसाठी पैशांच्या मागणीचे! या संदर्भातील चित्रफीत समाजमाध्यमांत ‘व्हायरल’ होताच ‘पारदर्शक’ कारभाराचा दावा करणाऱ्या भाजप नेते-पदाधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. ही चित्रफीत कशी खोटी आहे, याची उत्तरे देता देता नेत्यांना घाम फुटला.

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भाजप कार्यालयात तिकीटवाटपावरून गहजब उडाला होता. पक्षनिष्ठा, पक्षासाठी केलेले काम यापेक्षा पक्षनिधीच्या नावाखाली कोण किती पैसे देतो याला महत्त्व दिले गेल्याचे आरोप झाले. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप व दोन-तीन पदाधिकाऱ्यांनी पैसे घेऊन तिकिटे विकल्याचे आरोप नाराजांकडून करण्यात आले होते. एका महिला इच्छुकाने शहराध्यक्षांचा एकेरी उल्लेख करीत आत्मदहनाची धमकी दिली. या घडामोडी घडत असताना भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात उमेदवारांकडून पैसे कसे जमा करण्यात आल्याचे दर्शवणारी चित्रफीत समाजमाध्यमांत ‘व्हायरल’ झाल्यानंतर भाजपच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली. पक्ष कार्यालयात कार्यरत ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण शेंदुर्णीकर व नाना शिलेदार हे इच्छुक उमेदवारांकडून रक्कम गोळा करीत असल्याचे चित्रफितीत दिसते. तिकिटासाठी दीड ते दोन लाख रुपये रोख अथवा धनादेशाच्या स्वरूपात पैसे द्यावे लागतील असे सांगितले जात होते. अकस्मात झालेल्या मागणीने काही उमेदवार हबकले. काहींना ही थट्टा वाटली. त्यांनी प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला असता कोणालाही फोन केला तरी पैसे द्यावेच लागतील, असे संबंधितांकडून उमेदवारांना सांगण्यात आले.

ही चित्रफीत ‘व्हायरल’ झाल्यानंतर भाजपच्या वर्तुळात खळबळ उडाली. भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर झालेल्या आरोपांना या चित्रफितीने पुष्टी दिल्याची प्रतिक्रिया नाराजांनी व्यक्त केली. आ. सीमा हिरे यांनी शहराध्यक्षांवर ताशेरे ओढले. उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेत स्थानिक आमदारांना विश्वासात घेतले नाही. संबंधितांनी तिकीटवाटपात गोंधळ घातला. त्यामुळे तीन प्रभागांत पक्षाचे उमेदवार नाहीत. या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल वरिष्ठ पातळीवर तक्रार करणार असल्याचे हिरे यांनी म्हटले आहे. शहराध्यक्ष आ. सानप यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळत तिकीटवाटपात कोणतीही आर्थिक देवाणघेवाण झाली नसल्याचा दावा केला. या मुद्दय़ावरून मनसेने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. ‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा देणाऱ्या भाजपचा खरा चेहरा यानिमित्ताने उघड झाला असून इच्छुकांकडून घेतलेली ही रक्कम निवडणुकीचा अधिकृत निधी म्हणून दाखविणार आहात का, असा खोचक प्रश्न मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी उपस्थित केला आहे.

चित्रफितीत काय?

  • पक्ष कार्यालयात कार्यरत ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण शेंदुर्णीकर व नाना शिलेदार हे इच्छुक उमेदवारांकडून रक्कम गोळा करीत असल्याचे चित्रफितीत दिसते.
  • तिकिटासाठी दीड ते दोन लाख रुपये रोख अथवा धनादेशाच्या स्वरूपात पैसे द्यावे लागतील असे सांगितले जात होते.