सध्या शिक्षण विभाग आयोजकाच्या भूमिकेत असून वेगवेगळ्या दिवसाचे औचित्य साधत तो दिवस धूमधडाक्यात साजरा करण्याकडे कल वाढत आहे. जागतिक योग दिनही यास अपवाद नाही. नव्या शैक्षणिक वर्षांच्या आरंभाआधीच आठ दिवसांपासून योग दिनाच्या कार्यक्रमाचा अट्टहास करत शाळांना कार्यक्रम राबविण्याची तंबी दिली आहे. साजरीकरणाच्या नादात विद्यार्थी आणि शिक्षकांना वेठीस धरले जात असल्याने शैक्षणिक वर्तुळात नाराजीचा सूर उमटत आहे.

नव्या शैक्षणिक वर्षांचा श्रीगणेशा शुक्रवारी झाला. शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या वषरेत्सवाची धामधूम संपत नाही तोवर शिक्षण विभागाकडून जागतिक योग दिन साजरा करण्याचे फर्मान काढण्यात आले आहे. यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी सूत्रबद्ध नियोजन करत जिल्ह्य़ातील सर्व शाळांना आवश्यक सूचना, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक योगासनांचे प्रकार याची माहिती दिली.

सकाळ आणि दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांना एकत्र करत एकाच वेळी मैदानावर किंवा पाऊस पडत असेल तर वर्गात योग दिन करण्यात यावा अशी सूचना करण्यात आली. योगासनांचे प्रात्यक्षिक, त्या अनुषंगाने अन्य तयारी, तसेच गुरुवारी सकाळी पावणेसात ते दुपारी साडेबारा या वेळेत जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा भरविण्यात येणार आहेत. वर्षभर या संदर्भात कुठले उपक्रम राबवता येतील याची चाचपणी सध्या सुरू आहे. शाळेने साजरा केलेला योग दिनाचा अहवाल आणि छायाचित्र केंद्रप्रमुखांना तसेच पंचायत समितीकडे जमा करायचे आहे.  तालुका तसेच जिल्हा स्तरावर किती शाळांनी उपक्रमात सहभाग घेतला. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि अन्य नागरिक यांची संख्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मागविली आहे.

वास्तविक वषरेत्सवात ‘माझ्या शैक्षणिक विश्वातील पहिले पाऊल’ उपक्रम राबविताना शिक्षकांची दमछाक झाली. त्यात विद्यार्थीही भांबावले असताना योग दिन भव्य स्वरूपात साजरा करत त्याच्या कागदोपत्री अहवालाचा अट्टहास का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकाच वेळी दोन सत्रांतील वर्ग भरवले जात असताना ज्या शाळांना पुरेसे मैदान नाही, त्यांना वर्गात योगाचे प्रात्यक्षिक करावे लागणार आहे.

एकाच वेळी दोन सत्रांतील विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात बसवायचे कसे, योग दिनाचा कार्यक्रम सकाळी साधारणत: दीड ते दोन तास सुरू राहील. त्यानंतर शाळा सुरू राहील, पण त्या वेळी दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांचे काय करायचे, कार्यक्रम संपल्यानंतर त्यांची मानसिकता पाहता विद्यार्थी पुन्हा शाळेत येतील का, तसेच सध्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रचार सुरू असताना आणि शिक्षकांना काही शैक्षणिक संस्थांनी त्या कामात जुंपले असताना नव्याने योग दिनाची जबाबदारी, त्याचे नियोजन या सर्व धावपळीत साप्ताहिक अभ्यास पूर्ण कसा करून घ्यायचा, असे प्रश्न शिक्षकांसमोर आहेत.

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर जबाबदारी

माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे योग दिनाच्या नियोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली असून त्याचे नियोजन सुरू आहे. काही ठिकाणी दोन-तीन शाळा एकत्र येत, तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे पालक आणि अन्य नागरिकांच्या मदतीने योग दिन साजरा करण्यात येणार आहे.  – रामचंद्र जाधव (शिक्षण उपसंचालक, नाशिक विभाग)