09 December 2019

News Flash

आरोग्यदायी सिगारेट ते शेवग्याच्या च्यवनप्राशपर्यंत

‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ अंतर्गत नावीन्यपूर्ण संकल्पनांचा आविष्कार

(संग्रहित छायाचित्र)

धूम्रपान आरोग्यास हानिकारक असल्याने तयार करण्यात आलेली आरोग्यदायी हर्बल सिगारेट.. महिलांची कामाची धावपळ लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेली फिरती पिठाची गिरणी.. कुपोषणावर मात करण्यासाठी शेवग्याच्या शेंगांपासून तयार करण्यात आलेले च्यवनप्राश.. टाकाऊतून टिकाऊ या संकल्पनेवर भर देत टायरपासून तयार करण्यात आलेली पादत्राणे, अशा वेगवेगळ्या नावीन्यपूर्ण संकल्पनांचा आविष्कार नाशिककरांना अनुभवायला मिळाला.

निमित्त होते जिल्हा नावीण्यता परिषदेमार्फत महिला बचत गटांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ या योजनेचे. यातील निवडक १० संकल्पनांवर प्रत्यक्ष काम व्हावे यासाठी स्टार्टअप धोरण अंतर्गत दोन लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

येथील रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा नावीन्यता परिषद, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाऊर्जासह अन्य संस्थांच्या सर्व तालुका समित्यांनी निवडलेल्या प्रत्येकी पहिल्या १० नावीन्यपूर्ण संकल्पनांचे बुधवारी सादरीकरण करण्यात आले. नावीन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या कौशल्य आणि उद्योजकता विभागाने ‘महाराष्ट्र राज्य नावीन्यपूर्ण स्टार्टअप धोरण’ अंतर्गत बचत गटांसाठी ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ ही योजना सुरू केली आहे.

येवला येथील दुर्गेश्वरी महिला बचत गटाने सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला घेत तो भाजीपाला ग्राहकांना थेट घरपोच देण्याची व्यवस्था केली आहे. आदिवासीबहुल असलेल्या सुरगाणा तालुक्यातील जांभुळपाडा येथील रमाबाई स्वयंसाहाय्यता बचत गटाने परिसरातील कुपोषणाची समस्या लक्षात घेता कमी पाण्यावर येणारे शेवगा पीक घेत कुठलीही आर्थिक गुंतवणूक न करता घरच्या घरी शेवग्याच्या शेंगापासून औषधी भुकटी-च्यवनप्राश तयार केले आहे. जे कुपोषण, रक्ताक्षयावर उपयुक्त ठरेल. याच तालुक्यातील बोरगाव येथील सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन वेगवेगळी शेती अवजारे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिली आहेत. मालेगाव येथील हसनयन बचत गटाच्या महिलांनी हातमागात टाकून देण्यात येणाऱ्या सुतापासून घरातच राहून सायकलच्या

लोखंडी रिंगपासून चरखा तयार करत त्यावर सूतकताई करणे सुरू केले आहे. यातून तयार होणाऱ्या सुतापासून वस्त्र निर्मिती करण्यात येत आहे. इगतपुरीतील साईकृपा बचत गटाने टायरपासून चप्पल बनविण्याची संकल्पना मांडली आहे. त्र्यंबकेश्वर येथील मेट चंद्राची येथील आदिवासी महिलांनी सॅनिटरी नॅपकिन बनविण्यास सुरुवात केली असून गावातील मुली तसेच महिलांना अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येत असून सिन्नर येथील एका बचत गटाने हर्बल सिगारेटची निर्मिती केली आहे. याअंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान त्यांच्या तालुका आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू आहे. याचा लाभ १३१८ बचत गटांनी घेतला. त्यास चार हजार १८२ महिलांची उपस्थिती होती. तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तालुका समितीसमोर नावीन्यपूर्ण व्यवसाय संकल्पनांचे सादरीकरण घेण्यात आले. यामध्ये ५९७ गटांनी सादरीकरण केले. यातून प्रत्येक तालुक्यातील १० बचत गटांच्या नावीण्यपूर्ण उत्कृष्ट संकल्पनांची निवड करण्यात आली आहे. बुधवारी जिल्ह्य़ाच्या १५ तालुक्यांमधील १५० बचतगटांनी परीक्षकांसमोर आपआपल्या वेगवेगळ्या संकल्पना सादर केल्या. जिल्ह्य़ातून वेगवेगळ्या संकल्पनांवर ग्रामीण विशेषत आदिवासी भागातील महिला काम करत आहेत. महिला सक्षमीकरणाचा अर्थ या महिलांना खऱ्या अर्थाने समजला असून अतिशय आत्मविश्वासाने त्या आपली संकल्पना मांडत असल्याचे परीक्षक तसेच महाऊर्जाचे व्यवस्थापक अनंत अग्निहोत्री यांनी सांगितले.

हा अनुभव समृद्ध करणारा होता. व्यावसायिक प्रशिक्षण काळाची गरज आहे. बचत गट पापड, लोणचे ही चौकट मोडत वेगळे काही करू पाहत आहेत. त्यासाठी शासनासह प्रशासन वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक मदत आणि मार्गदर्शन करत आहे. पाठीवर पडणारी ही थाप खऱ्या अर्थाने उद्योजिका घडवेल, असा विश्वास शाहीन बानो यांनी व्यक्त केला.

First Published on August 15, 2019 1:22 am

Web Title: invention of innovation concepts under harkani newcomer maharashtra abn 97
Just Now!
X