क्लबसाठी आता १५ फेब्रुवारीचा मुहूर्त

गंगापूर धरणावरील बोट क्लबसाठी काही विभागांच्या परवानग्या मिळाल्या नसताना आधीच बोटी खरेदीची घाई का करण्यात आली, त्याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांनी सांगितले. या बोट क्लबच्या शुभारंभासाठी २६ जानेवारी रोजीचा निश्चित केलेला मुहूर्त विविध कारणांमुळे लांबणीवर पडणार असल्यावर ‘लोकसत्ता – नाशिक वृत्तान्त’ने प्रकाशझोत टाकला होता. त्यावर शिंदे यांनी शिक्कामोर्तब करत आता हा बोट क्लब १५ फेब्रुवारी रोजी कार्यान्वित होणार असल्याचे सांगत नवीन मुहूर्त जाहीर केला. क्लबसाठी खरेदी केल्या गेलेल्या बोटींचा ‘वॉरंटी’ अर्थात विनाशुल्क देखभाल-दुरुस्तीचा कालावधी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. या उपक्रमासाठी तत्कालीन पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन लोकसभा निवडणुकीआधी त्याचे औपचारिक उद्घाटन केले होते. तेव्हा काही विभागांच्या परवानग्या मिळाल्या नसताना बोट खरेदी केली गेल्याची बाब शिंदे यांनी उघड केली.

ट्रॅव्हल एजंट ऑफ नाशिक अर्थात तान संस्थेच्या वतीने इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयात आयोजित पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी शिंदे यांच्या हस्ते आणि आ. प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी पर्यटन विकास महामंडळ नाशिक विभागाच्या प्रमुख प्रज्ञा बढे-मिसाळ, तानचे अध्यक्ष दत्ता भालेराव आदी उपस्थित होते. स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी माजी पर्यटनमंत्री भुजबळ यांनी गंगापूर धरणावर बोट क्लबची संकल्पना मांडली होती. पर्यटकांसाठी खाद्यगृह, निवासव्यवस्था आदी सोयी-सुविधा या ठिकाणी निर्माण करण्यात आल्या. धरणातील पाण्यात सफर करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी अत्याधुनिक तंत्रप्रणालीवर आधारित ४७ बोटींची खरेदी केली गेली. लोकसभा निवडणुकीच्या आधी भुजबळ यांनी घाईघाईत क्लबचे औपचारिक उद्घाटनही केले; परंतु बोटींची खरेदी आणि हे उद्घाटन काही विभागांची परवानगी मिळाली नसताना झाल्यावर शिंदे यांनी बोट ठेवले. क्लबसाठी खरेदी केलेल्या उपरोक्त बोटी दीड ते दोन वर्षांपासून प्लास्टिक आवरणात धूळ खात पडून आहेत. या काळात त्यांचा ‘वॉरंटी’ कालावधी संपुष्टात आला. त्या वेळी बोटी खरेदीची घाई केल्याचा हा परिपाक असून त्याची चौकशी केली जाणार असल्याचे शिंदे यांनी सूचित केले.

बोट क्लब सुरू करण्यासाठी निश्चित केलेला मुहूर्त लांबणीवर पडणार असल्याचे त्यांनी मान्य केले. हा क्लब चालविण्यास देण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करून १५ फेब्रुवारीपर्यंत क्लब कार्यान्वित केला जाईल. पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी गोदा आरतीचे विपणन करताना या उपक्रमासाठी आवश्यक तो निधी शासन देईल. जैन धर्मीयांच्या मांगी तुंगी तीर्थक्षेत्र विकासासाठी शासनाने २० आणि इतर विभागांकडून २० असा एकूण ४० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. आ. फरांदे यांनी पर्यटन जिल्हा म्हणून नाशिकचा विकास करण्याची मागणी केली, तर तानचे अध्यक्ष भालेराव यांनी नाशिक विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी ‘हॉपिंग फ्लाइट’ची सेवा सुरू करण्याकडे लक्ष वेधले. तानतर्फे दरवर्षी देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा चौधरी यात्रा कंपनीचे प्रमुख ब्रिजमोहन चौधरी यांना देण्यात आला. चौधरी यांच्या सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

महापौर वैतागून परतले

पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सकाळी दहा वाजता महापौर अशोक मुर्तडक यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. प्रवेशद्वारावर त्यांनी तानच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मुख्य अतिथींची प्रतीक्षा केली. पर्यटन राज्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा कार्यक्रम स्थळाकडे आला, पण लागलीच तो आ. फरांदे यांच्या निवासस्थानाकडे निघून गेला. २० ते २५ मिनिटे प्रतीक्षा करूनही पाहुणे येत नसल्याने वैतागलेल्या महापौरांनी दुसऱ्या कार्यक्रमाचे कारण देऊन निघून जाणे पसंत केले.

गृह राज्यमंत्रिपदाचा ‘ताण’ पर्यटनामुळे हलका

गृह राज्यमंत्रिपदाची जबाबदारी असल्याने कामाचा बराच ‘ताण’ असतो. त्या जोडीला पर्यटन खातेही असल्याने तो ताण हलका करण्याची संधी मिळते, असे सांगत शिंदे यांनी आपल्या देश व विदेशातील भ्रमंतीची माहिती दिली.