शहरात नव्याने उदयास आलेला सराफ बाजार अशी ओळख बनलेल्या कॅनडा कॉर्नर परिसरातील चौकातून वळण घेणे धोकादायक ठरले असून सभोवलाच्या संकुलातील ओटे अपघातांना निमंत्रण देत असल्याची वाहनधारकांची तक्रार आहे. ओटय़ामुळे वारंवार अपघात घडत असूनही सिग्नलवर कार्यरत वाहतूक पोलीस मौन बाळगून आहे. दुसरीकडे कॉलेज रोडवरून महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयाकडे जाताना प्रत्येकास या अडथळ्याची जाणीव होते. परंतु, शहरात धडक अतिक्रमण मोहीम राबविणाऱ्या महापालिकेने अडथळा ठरलेल्या बाबींकडे डोळेझाक करण्याचे धोरण ठेवले आहे.

मागील सहा ते सात वर्षांत अतिशय दाटीवाटीच्या भागात असणारा सराफ बाजार हळूहळू उच्चभ्रू वसाहतीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कॉलेज रोडकडे स्थलांतरित होत आहे. कॅनडा कॉर्नर परिसर त्याचा मुख्य केंद्रबिंदू. या चौकाच्या सभोवती बडय़ा सराफी व्यावसायिकांच्या पेढय़ा आहेत. गावठाणचे हे क्षेत्र असल्याने सिग्नलपासून अतिशय निकटच भव्य व्यापारी संकुले साकारल्याचे लक्षात येते. अगोरा टॉवर्स हे त्यातील एक संकुल. या ठिकाणी तळ मजल्यावर बडय़ा सराफी पेढय़ा आहेत. या संकुलाचा सिग्नलच्या गोलाकार वळणापर्यंत विस्तारलेला ओटा वाहनधारकांची परीक्षा पाहतो. कॉलेजरोड आणि गंगापूर रोडने या चौकातून वळण घेताना ओटय़ाने अनेक वाहनधारकांना जायबंदी केले. मंगळवारी असाच अपघात या ठिकाणी घडला. वारंवार अपघात घडूनही अतिशय विचित्र पद्धतीने रस्त्यावर आलेला ओटा हटविला जात नसल्याने वाहनधारकांकडून संताप व्यक्त होत आहे.

या व्यापारी संकुलालगत काही वर्षांपूर्वी महापालिकेने ‘पे अ‍ॅण्ड पार्क’चा फलक लावला होता. कालांतराने तो गायब झाल्याची स्थानिकांची तक्रार आहे. संकुल परिसरात इतर वाहने उभी राहू नयेत म्हणून वळणावर ओटय़ाचा भाग उतारासारखा केला गेला. वळण घेताना ही बाब अपघातास कारणीभूत ठरत असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. बडय़ा व्यावसायिकांशी निगडित हा विषय असल्याने वाहतूक पोलीस आणि पालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची वाहनधारक आणि स्थानिकांची भावना आहे.

((   कॅनडा कॉर्नर चौकातील वळणालगत असलेल्या व्यापारी संकुलातील ओटा अपघातांना निमंत्रण देत आहे.   ))