सुरक्षेसंबंधित उपाय न केल्यास कारवाई

नाशिक : सीसी टीव्ही कॅमेरे बसविताना किमान १५ दिवसांचे चित्रण यंत्रणेत साठवून ठेवणे बंधनकारक आहे. सुरक्षेसंबंधित उपाय न केल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.  युको बँकेत भिंतीला भगदाड पाडून चोरटय़ांनी संगणक, लॅपटॉप लंपास केल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने संबंधितांना या संदर्भातील सूचना दिल्या.

गेल्या वर्षी उंटवाडी रस्त्यावरील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात गोळीबार करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. दरोडा, चोरी वा तत्सम घटनांमध्ये वित्तहानीचे प्रकार घडले आहेत. मध्यवर्ती बाजारपेठेतील युको बँकेत चोरटय़ांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना  यश आले नाही. मुथूट फायनान्सच्या घटनेनंतर पोलिसांनी बँक, इतर महत्वाच्या आस्थापनांची बैठक घेऊन सुरक्षेसंबंधी उपाय करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, अनेकांकडून त्यास प्रतिसाद मिळाला नसल्याचा आक्षेप पोलिसांनी नोंदविला आहे. या पाश्र्वभूमीवर, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांनी कलम १४४ अन्वये सुरक्षेसंबंधित उपाय योजना करण्यासाठी आदेश दिले आहेत.

त्यानुसार बँक, वित्तीय संस्था, सराफ व्यावसायिक खासगी लॉकर कंपनी, पेट्रोल पंप, मॉल, चित्रपटगृह, मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेल, वाइन तसेच मद्य विक्री दुकाने, खाद्यगृहे या आस्थापनांना आतील आणि बाहेरील परिसर सीसी टीव्हीच्या दृष्टीक्षेपात आणावा लागणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित करताना ती चांगल्या दर्जाची असावी. ये-जा करणाऱ्यांवर नजर ठेवावी.

यंत्रणेतील सीसी टीव्ही कॅमेरे सुरू असतील याची दक्षता घेणे बंधनकारक आहे. आस्थापनांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती मिळण्यासाठी मोठा आवाज होईल, अशीही यंत्रणा बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याबाबत स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती द्यावी. सीसी टीव्हीतील चित्रण किमान १५ दिवस साठविणे आवश्यक आहे. पोलिसांनी मागणी केल्यावर ते तात्काळ उपलब्ध करण्यास सांगण्यात आले आहे. सुरक्षेसंबंधिच्या उपायांकडे दुर्लक्ष केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.