अनाथ, निराधार बालकांना हक्काचे घर मिळावे तसेच विशेष बालकांनाही मायेची ऊब मिळावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या येथील आधाराश्रमाला ‘कारा’च्या सहकार्याची जोड मिळाली आहे. कारा आणि आधाराश्रम यांच्या एकत्रित प्रयत्नांतून नाशिकमधून आतापर्यंत पाच बालकांनी सातासमुद्रापार आपल्या पालकांच्या कुशीत हक्काची जागा मिळवली आहे. सोमवारी आश्रमातील पावणेदोन वर्षीय ‘शिव’लाही इटलीस्थित लिडा मॉरिझिओ आणि फॉस्टी डिबोरा यांनी दत्तक घेतले.

गेल्या काही वर्षांत अनाथ बालकांना दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातही मुलींसाठी काही ठिकाणी प्रतीक्षा करावी लागते. महाराष्ट्रात याबाबत सुखावह चित्र आहे. मात्र या सर्वात विशेष काळजी आवश्यक असलेल्या बालकांचे दत्तक म्हणून जाण्याचे प्रमाण नगण्य म्हणजे शून्यच्या आसपास आहे. परदेशी पालकांनी ‘मुले म्हणजे देवाघरची फुले’ असे मानत या विशेष बालकांचा सहज स्वीकार केला. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत (सेंट्रल अ‍ॅडोप्शन रिसरेस एजन्सी) काराच्यावतीने विशेष बालकांसाठी पुढाकार घेत माहितीजालाच्या माध्यमातून ही प्रक्रिया अधिक सोपी करून दिली. या संधीचा फायदा येथील आधाराश्रमाने घेतला असून आत्तापर्यंत आश्रमातील पाच बालके इटली आणि स्पेन या ठिकाणी दत्तक म्हणुन गेली आहेत. सोमवारी आश्रमातील पावणेदोन वर्षीय शिवच्या हाकेला इटलीस्थित मॉरिझिओ व डिबोरा दाम्पत्याने साद देत आपल्या कुशीत घेतले. साधारणत: २० दिवसांचा असतांना एक बालक आधाराश्रमात बाल कल्याण विभागाच्या सहकार्याने दाखल झाले. त्याला विशेष उपचाराची गरज होती. एवढय़ा लहान वयात हे उपचार सहजपणे स्वीकारणारा शिव आश्रमातील सर्वाचा लाडका आहे. त्यालाही इतरांप्रमाणे हक्काचे घर मिळावे यासाठी आश्रमाने त्याच्या आजारासह त्याची संपूर्ण माहिती काराच्या संकेतस्थळावर दिली होती. ही सर्व माहिती मिळवत पालकांनी त्याच्या दत्तक विधानासाठी संस्थेकडे विचारणा केली. भारतीय संस्कृतीविषयी आदर असल्याने येथीलच बालक दत्त घ्यायचे, असा विचार उभयतांनी चार वर्षांपूर्वीच केला होता. दरम्यान, सोमवारी शिव यास प्रत्यक्षात पाहण्यासाठी दोघेही आतुर झाले होते. तेथील सर्व वातावरणाची ओळख व्हावी यासाठी, त्याचे नातेवाईक, त्याचे घर याची काही छायाचित्रे याचा अल्बम त्याला पाहण्यासाठी दिला होता. आई-बाबांना पाहताच त्याने त्यांच्याकडे झेप घेतली आणि सर्वाचे डोळे पाणावले. त्याच्यासाठी पालकांनी खास काही खेळणी आणली होती. आई-बाबांच्या कडेवर जाऊन शिव खेळण्यात मग्न झाला. मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व कागदपत्रांची पूर्तता करत शिव मंगळवारी पालकांसोबत इटलीकडे रवाना होईल.